पाचोरा, जि. जळगाव : पाचोरा- भडगाव तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर अपूर्ण रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, या मागणीसाठी मंगळवारी सकाळी महाविकास आघाडीच्यावतीने पाच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पाचोरा तालुक्यातील नांद्रा, पाचोरा शहर, भडगाव , नगरदेवळा आणि कजगाव अशा पाच ठिकाणी एकाच वेळी रास्ता रोको केल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
पाचोरा येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनात माजी आमदार दिलीप वाघ, शिवसेना ( ठाकरे) गटाच्या वैशाली सूर्यवंशी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, खलिल देशमुख यांच्यासह तीनही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. येत्या पाच मार्चपासून या रस्त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. मार्च महिनाअखेर या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन प्रांताधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे देण्यात आले. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.