फैजपूर, ता. यावल : शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधील विद्यानगर भागात दुगंर्धीयुक्त पाणी येत असल्याने डायरी सदृष्य साथीच्या आजाराचा काही लोकांना त्रास जाणवत असल्याची ओरड घेवुन नागरिकांनी गुरुवारी पालिकेवर धडक दिली.यावेळी या नागरिकांनी दुगंर्धीयुक्त पाण्याची बादली मुख्याधिकारी यांच्यासमोर ठेवून आपला संताप व्यक्त केला. फैजपूर शहरात कोराना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून पालिकेकडून शहरात साफसफाई व फवारणीवर भर दिला असतांना गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान विद्यानगर भागातील महिला व नागरिकांनी पालिकेवर धडक देत त्यांच्या भागात काही दिवसांपासून दुगंर्धी युक्त व काळपट पाणी येत असल्याची ओरड करत पाणी पुरवठा विभागात बसलेल्या मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या टेबल वर दुगंर्धीयुक्त पाण्याची बादली ठेवून संताप व्यक्त केला. यावेळी उपस्थित नागरिकांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा दिला व विद्यानगर भागात नवीन पाईपलाईन टाकावी अशी मागणी केली आहे. दरम्यान यावेळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी आलेल्या नागरिकांची समस्या तात्काळ सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक अमोल निंबाळे, नगरसेवक देवा साळी यांच्यासह प्रभाग आठ मधील महिला व नागरिक उपस्थित होते.
दुषित पाण्यामुळे फैजपुरात संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 4:00 PM