जळगाव : कबुतर चोरी झाल्याबाबतचा जाब विचारल्याचा राग आल्याने दीपक बाळू कोळी (वय २१) याला पाच जणांनी मारहाण करत त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केल्याची घटना २८ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास असोदा येथे घडली. याप्रकरणी शनिवारी रात्री तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आसोदा येथे प्रतिभा बाळू कोळी या मुलगा दीपक कोळी याच्यासह वास्तव्यास आहेत. दीपककडे असलेल्या कबुतराची चोरी झाली. याबाबत २८ मे रोजी प्रतिभा कोळी यांनी गावातीलच योगेश आधार कोळी याला कबुतर चोरीबाबत जाब विचारला. त्याचा राग आल्याने योगेश कोळी याने आणखी चार जणांसोबत दीपक कोळी यास शिवीगाळ करत चापट- बुक्क्यांनी मारहाण केली. यादरम्यान योगेश कोळी याने दीपक कोळी याच्या खांद्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर दुखापत केली. घटनेत दीपक कोळी हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान याप्रकरणी प्रतिभा कोळी यांच्या फिर्यादीवरून योगेश आधार कोळी (वय २७), संदीप प्रकाश कोळी (वय ३९), अविनाश ऊर्फ हर्षल संजय जोहरे (वय १८), तुळशीराम शंकर कोळी (वय ६१) व मंगेश ऊर्फ बबलू गोकूळ कोळी, सर्व रा. असोदा, ता. जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल साहेबराव पाटील हे करीत आहेत.