जळगाव : तालुक्यातील कानळदा स्मशानभूमीकडे जायला रस्ता नसल्याने अंत्यविधीसाठी पर्याय खुंटला आणि संतप्त ग्रामस्थांनी ग्रा.पं.कार्यालयासमोरच अत्यंविधी आटोपण्याची भूमिका घेतली. त्यामुळे कानळद्यात संतप्त जमावाच्या भावना पाहून ग्रा.पं.ने चिखल दूर सारत ऐनवेळी रस्ता करुन दिला. अंत्यसंस्काराची वाट मोकळी झाल्याने जमावही माघारी परतला आणि शांततेत अंत्यसंस्कार उरकण्यात आले.
कानळदा येथील वना सातोडे यांचे रात्री निधन झाले. शनिवारी सकाळी त्यांची अंत्ययात्रा निघाली. या अंत्ययात्रेत भोई समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. स्मशानभूच्या वाटेवर अंत्ययात्रा आल्यावर ग्रामस्थांचा नाईलाज होणार, याची जाणीव झाली. स्मशानभूमीकडे जाणारी वाट पूर्णत: पाण्यात आणि चिखलात बुडाल्याने काही जणांनी ग्रा.पं.कार्यालयासमोर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अनेक युवक सरसावले. त्यांनी अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य ग्रामपंचायतसमोर टाकले. त्यानंतर सरपंच पुंडलिक सपकाळे यांच्यासह सदस्यांनी धाव घेतली. तेव्हा शाब्दिक चकमक उडाली. ग्रामपंचायतीने तत्काळ स्मशानभूमीचा रस्ता तयार करुन देण्यासाठी तयारी दाखविली. तेव्हा ग्रामस्थांनी ऐनवेळी दखल घेण्यापेक्षा यापूर्वीच स्मशानभूमीची वाट सुकर करायला हवी होती, असा पवित्रा घेतला. सरपंच सपकाळे यांनी यंत्रणेला हाताशी घेत तत्काळ स्मशानभूमीचा चिखल दूर सारला आणि मुरुम, माती, वाळूच्या माध्यमातून हा रस्ता तयार करुन दिला. त्यानंतर ग्रामस्थांचा संताप कमी झाला. त्यांनी अंत्यसंस्कारासाठी आणलेले साहित्य ताब्यात घेत स्मशानभूमी गाठली आणि वना सातोडे यांच्यावर अंत्यसंस्कार पार पाडले.
रस्ताही तकलादूदरम्यान, यापूर्वीही स्मशानभूमीच्या रस्त्यावरुन कानळद्यात वाद झाला होता. त्यावेळी अनेकांनी संताप व्यक्त करीत आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती. पुन्हा तोच प्रकार घडला. त्यामुळे ग्रा.पं.ने ऐनवेळी करुन दिलेल्या रस्त्यामुळे शनिवारी अंत्यसंस्कार आटोपले. मात्र हा तकलादू रस्ता काही दिवसात पुन्हा बंद होईल आणि तिथल्या चिखलामुळे पुन्हा अंत्यसंस्कारासाठी कसरत करावी लागेल, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. कायमस्वरुपी रस्ता व्हावा, अशी मागणीही यानिमित्ताने करण्यात आली आहे.
स्मशानभूमीचा रस्ता पावसामुळे चिखलमय झाला आहे. ग्रामस्थांचा संताप पाहता तातडीने रस्ता तयार केला. मात्र यापुढे पक्क्या रस्त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. -पुंडलिक सपकाळे, सरपंच.