राजेंद्र शर्माधुळे : धुळे शहर भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा पक्षाविरोधी खुले बंड पुकारले आहे. आमदार गोटे यांनी पक्षाने दिलेल्या उमेदवाराविरोधात धुळे लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच आज त्यांनी महापालिका निवडणुकीच्या वेळेस म्यान केलेले आमदार पदाच्या राजीनाम्याचे शस्त्र पुन्हा एकदा उगारले आहे. त्यांनी सोमवारी आपल्या आमदार पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे दिला.धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांचा भाजपातील गेल्या साडेचार वर्षांचा प्रवास हा ‘एकला चालो रे’ पद्धतीचा राहिला आहे. पक्षातील स्थानिक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याविरोधात वक्तव्य करण्याचीच त्यांची भूमिका राहिली आहे. आमदार अनिल गोटे यांच्या भाजप प्रवेशापासूनच स्थानिक पदाधिकारीही त्यांच्याविरोधातच राहिले आहे.आमदार अनिल गोटे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस सुद्धा अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावेळेस भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंढे यांनी त्यांना विधानसभेत उमेदवारी देण्याचे आश्वासन देऊन लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करण्यापासून रोखले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आधीच गोपीनाथ मुंढे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या प्रयत्नाने अनिल गोटे यांना विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली. ही उमेदवारी मुंबईतून जाहीर करण्यात आली. त्यावेळेसही स्थानिक उमेदवारांना माहित नव्हते की गोटेंना उमेदवारी दिली आहे. ते अचानक मुंबईहून आले व उमेदवारी दाखल केली.त्यानंतर मागील साडेचार वर्षात आमदार अनिल गोटे आणि भाजपचे लोकप्रतिनिधी आमदार जयकुमार रावल आणि खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्याशी सतत आरोप- प्रत्यारोप सुरुच होते.मनपा निवडणुकीत बंडखोरीमहापालिका निवडणुकीच्या वेळेस धुळयातील गुंडगिरी आणि पक्षात प्रवेश देण्यात आलेल्या राष्टÑवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवित आमदार अनिल गोटे यांनी भाजपाविरोधी भूमिका घेत आपल्या आमदार पदाचा राजीनामा दिला होता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात मध्यस्थी केल्याने राजीनाम्याचे प्रकरण तेथेच थांबले होते.या निवडणुकीच्या वेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सभेत अचानक व्यासपीठावर गेल्याने उडालेला गोंधळ आणि घोषणाबाजीची घटना खूप गाजली होती. त्यानंतर पक्षाशी उघडपणे बंड करुन आमदार अनिल गोटे यांनी निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभे केले होते.आमदारकीचा दिला राजीनामा : पक्षविरोधी उमेदवारी करतांनाही घोषणा मात्र ‘अण्णांना मत म्हणजे मोदी साहेबांनाच मत’उघड बंड तरी भाजपा शांतअशापद्धतीने पक्षात राहून पक्षाविरोधात उघडपणे बंड करुनही त्यांच्याविरोधात अद्यापपर्यंत भाजपकडून कुठलीही कारवाई झालेली नाही. आता पुन्हा एकदा आमदार गोटे यांनी खुले बंड पुकारले आहे. आताही बंड करतांना आमदार अनिल गोटे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विरोध नसल्याचे सांगत ‘अण्णांना मत म्हणजे मोदींना मत’ अशी घोषणा दिली आहे. त्यात भर अशी की आताही गोटेंनी आपल्या आमदारकीचा राजीनामाही दिला आहे. तो राजीनामा यावेळी भाजपचे प्रदेशातील नेते स्वीकारतील कि पुन्हा एकदा या कृत्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले जाईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
अनिल गोटे यांनी पक्षात राहून पुन्हा पुकारले पक्षाविरोधात ‘बंड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 1:08 PM