जळगाव : पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल 'एनर्जी ॲण्ड एन्व्हायर्मेंट फाउंडेशनतर्फे 'ग्लोबल एक्सलन्स अवॉर्डने' ऑनलाइन पद्धतीने २१ रोजी अनिल जैन यांना प्रदान करण्यात आला.
ऊर्जा व पर्यावरण फाउंडेशनचे हे व्हर्च्युअल फोरम असून त्यांनी दोन दिवसांची पाचवी जागतिक जलशिखर परिषद आयोजिली आहे. जैन इरिगेशनच्या पर्यावरण व पाण्याच्या संदर्भात केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याला अधोरेखित करून हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार जैन इरिगेशन सिस्टिम्सचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी स्वीकारला.
जलव्यवस्थापनातील नावीण्यपूर्ण तंत्रज्ञान म्हणजे स्मार्ट वॉटर मॅनेजमेंटचा उपयोग करून समाजाला विकासाच्या मार्गावर आणण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या संघटनांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्या कार्याबद्दल गौरवार्थ दी एनर्जी ॲण्ड एन्व्हायन्मेंट फाउंडेशन (इइएफ) या जागतिक संस्थेतर्फे हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
अनिल जैन यांनी ग्लोबल एक्सलन्स अवॉर्डने स्वीकारताना सांगितले की, त्यांना पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद आहे. हा पुरस्कार म्हणजे जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या दूरदृष्टीने आणि मार्गदर्शनाखाली चार दशकांहून जास्त काळात अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कंपनीने केलेल्या उच्च कृषी तंत्रज्ञानाच्या कार्याची पावतीच आहे. ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानामुळे सूक्ष्म सिंचन करता आले आणि त्यांच्या पिकांच्या उत्पादनात भरीव वाढ करता आली अशा शेतकऱ्यांना हा पुरस्कार अतुल जैन यांनी समर्पित केला आहे. अनिल जैन म्हणाले की, जैनच्या भात (तांदूळ) शेतीतील उच्च नावीन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानामुळे व ठिबक सिंचनातून कमी पाण्यात शेतकऱ्यांना खूप उत्पादन घेता आले आणि हे जैन इरिगेशनने सिद्ध करून दाखविले.
हा पुरस्कार अनिल जैन यांनी ऑनलाइन स्वीकारला, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या वकिलातीतील उच्चायुक्त बॅरी ओफॅरेला ए. ओ. तसेच मार्टेन व्हॅन डेन बर्ग (राजदूत, नेदरलँड्स), डॉ. व्ही. के. गर्ग (माजी व्यवस्थापकीय संचालक, पॉवर फिनान्स कॉर्पोरेशन), अनिल राझदान, (माजी सचिव, ऊर्जा, भारत सरकार आणि अध्यक्ष, एनर्जी अँड एन्व्हायर्मेंट फाउंडेशन) आदी मान्यवर अतिथी उपस्थित होते. (वा. प्र.)