चाळीसगाव, दि.10- शहराच्या दक्षिणेला अवघ्या 18 कि.मी. अंतरावर असणा-या गौताळा अभयारण्य व पाटणादेवी जंगल परिसरात 10 रोजी बुद्ध पौर्णिमाच्या पर्वावर सकाळी 11 वा प्राणी गणनेला सुरुवात झाली. विशेष म्हणजे ही गणना 11 रोजी सकाळी 11 र्पयत म्हणजे 24 तास चालणार आहे. यासाठी जंगलात गस्तीसाठी 23 निरीक्षण केंद्रे उभारण्यात आले असून वनविभागाच्या कर्मचा-यांसह एकुण 92 निसर्ग प्रेमी गणनेत सहभागी झाल्याची माहिती चाळीसगाव वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल एल.एम.राठोड यांनी लोकमतशी बोलतांना दिली.
26 हेक्टर जंगल परिसर
गौताळा अभयारण्याचे 20 हजार तर पाटणादेवी परिसरातील 6 हजार अशा 26 हजार हेक्टर परिसरातील जंगलव्याप्त भागात प्राणी गणना करण्यात येत आहे. यात 23 ठिकाणी निरीक्षण केंद्रे उभारली आहेत. प्रत्येक केंद्रावर वनविभागाचा एक कर्मचारी व तीन निसर्गप्रेमी यांचा सहभाग आहे. गणनेत सहाय्यक वनपाल पी.व्ही.जगत, वनपाल आर.बी.शेटे, मानद वन्यजीव संरक्षक व सर्पमित्र राजेश ठोंबरे, वनपाल, वनसंरक्षक, वनमजुर यांच्यासह निसर्गप्रेमींचा समावेश आहे.
पाणवठय़ांवर विशेष लक्ष
पाटणादेवी जंगल परिसरात विपुल प्राणी संपदा असून वनोषौधींसह दूर्मिळ वनस्पतींही येथे आढळतात. बिबटय़ा, तडस, लांडगे, कोल्हे, निलगाय, ससे, माकड, मोर, रानडुक्कर आदी प्राण्यांचा हजारोच्या संख्येने रहिवास आहे. प्राण्यांची गणना करतांना बहुतांशी निरीक्षण पॉईंट पाणवठय़ानजीक तयार केले गेले आहे. प्रत्यक्ष व प्राण्यांच्या पावलांच्या ठश्यांवरून गणना करण्यात येत असल्याची माहिती राजेश ठोंबरे यांनी दिली.
मोठी अन्नसाखळी, कृत्रिम पाणवठेही
गेल्या काही वर्षात पाटणादेवी जंगल परिसरात प्राणी संगोपनासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. रात्रीची गस्त वाढवून वृक्षतोड व प्राणी शिकारीला पूर्णपणे आळा घातला गेला आहे. याचे चांगले दृश्य परिणाम दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी पर्जन्यमान चांगले झाल्याने जंगलात अन्नसाखळीही विपुल प्रमाणात असून वनविभागाने कृत्रिम पाणवठेही तयार केले आहेत. गेल्या चार ते पाच वर्षात पर्यटकांच्या संख्येतही वाढ झाली असून वन्यजीव अभ्यासक आणि विदेशी पर्यटकांच्या भेटीही वाढल्या आहेत.