अनिता पाटील या मूळच्या वर्धा येथील. लग्नानंतर त्या नागपूरला स्थायिक झाल्या. सतीश पाटील हे महावितरण कंपनीत अधिकारी पदावर कार्यरत आहेत. २००५ मध्ये हे दाम्पत्य जळगाव शहरात वास्तव्याला आले आणि जळगावचेच झाले. नागपूरला असताना अनिता पाटील या मेडिकल स्टोअर्स चालवत असत. नंतर त्यांनी योग प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली. आणि यातच त्यांना त्यांचे ध्येय सापडले. त्यांनी त्याच मार्गावरून पुढे चालण्यास सुरुवात केली. जळगावला आल्यावर अनिता पाटील यांनी जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशनच्या माध्यमातून आपल्या कामाला सुरूवात केली. विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय योग स्पर्धांमध्ये पदकांची लयलुट करणारे तनय मलारा, श्रद्धा मुंदडा, योगेश्वरी मिस्त्री, राधिका पाटील हे अनिता पाटील यांचेच शिष्य आहेत. त्यांच्याकडे लयबद््ध योगा शिकण्यासाठी राज्यभरातून खेळाडू येतात. हे खेळाडू त्यांच्याच कुटुंबाचा भाग बनून राहतात.अनिता पाटील यांनी आशियाई आणि आंतरराष्ट्रीय योग स्पर्धांसाठी पंच म्हणून तसेच संघाचे प्रशिक्षक म्हणूनदेखील काम पाहिले आहे.अनिता पाटील यांची मुलगी श्रद्धा हीदेखील योगपटू आहे. ती सध्या फिलीपिन्स येथे शिकत आहे. तिने फिलीपिन्सच्या संघाकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी केली आहे.सध्या त्या जळगाव शहरात के.के. पाटील इन्स्टिट्यूट आॅफ योग, नॅचरोपॅथी अॅण्ड रिसर्चच्या माध्यमातून आपले योग प्रसाराचे काम करत आहे. त्यासोबत परदेशातूनही काही जण त्यांच्याकडे योग शिकायला येतात. यातील बहुसंख्य मुलांकडून त्या कोणतेही शुल्क घेत नाहीत. तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था पाटील यांच्या घरीच केली जाते.२००५ मध्ये तीन खेळाडूंना घेऊन सुरू झालेला हा प्रवास आता सुमारे ३५० च्या वर योगपटूंवर पोहचला आहे. त्यासोबतच अनेक विविध व्याधींनी त्रस्त असलेलेदेखील त्यांच्याकडे येऊन योग शिकतात. शहरातील झुलेलाल हॉल, जाणता राजा प्रतिष्ठान येथेदेखील त्यांचे योग वर्ग सुरू आहेत. ्अनिता पाटील या सध्या जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशनच्या सचिव आहे. त्याचप्रमाणे योगाशी संबंधित अनेक संस्थांवर त्यांचे काम सुरू आहे.-आकाश नेवे, जळगाव
योगाचा प्रचार करणाऱ्या अनिता पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 12:08 AM