कुठल्याही शाळेत शिक्षण न घेतलेले, साहित्यिकांमध्ये साहित्यरत्न ठरलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा आज जन्मदिवस. १ ऑगस्ट १९२० मध्ये सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका येथे अण्णा भाऊ यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण अतिशय गरिबी, दारिद्र्यात गेले.
अण्णा भाऊ, बालपणापासूनच वेगळ्या विचारसरणीचे आणि काहीतरी करावं असा विचार असलेले व्यक्ती. दलित आणि कामगारांच्या चळवळीत भाग घेतला. त्यांच्या हक्कासाठी त्यांनी लढा उभारला.
१९३१ ते १९४१ हा त्यांच्या जीवनातील अस्थिरतेचा व संक्रमणावस्थेचा काळ, याच काळात मुंबईमधील एक गिरणी कामगार, घाटकोपरच्या झोपडपट्टीत राहणारा, एका पत्र्याच्या खोलीत राहून साहित्य निर्मिती करीत होते. कष्टकरी संघटनेचे नेतृत्व सन १९४४ मध्ये त्यांनी ‘लाल बावटा’ कलापथकाची स्थापना आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग घेत संघटनात्मक कार्य केले. सन १९४५ हा त्यांच्यासाठी कथा लेखनाचा सुवर्णकाळ होता. या काळात अनेक कथा त्यांनी लिहिल्या.
गरीब कष्टकऱ्यांच्या जीवनाचे विदारक चित्र अण्णा भाऊंनी आपल्या कादंबरी, नाटक आणि कथांमध्ये रेखाटलं आहे. पोवाडा, लावणी, वगनाट्य याच बरोबर चळवळीचे गीत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील गीतसुद्धा अण्णा भाऊंचीच देण आहे. त्यांची ‘माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतीय काहिली’ ही लावणी आजही तितकीच लोकप्रिय आहे. जेव्हा गावाहून मुंबईला आले आणि त्यांची पत्नी जेव्हा गावाकडे होती. त्यांना जेव्हा तिची खूप आठवण येत होती, अशा आठवणीतून त्यांनी लावणीची निर्मिती केली. आजही मनाला भाळणारी अशी ही लावणी प्रत्येकाच्या तोंडावर येते.
लावणी आणि तमाशा याचं समीकरण अत्यंत सुरेख पद्धतीने त्यांनी रेखाटलं. खरे तर ते लावणी सम्राट होते. त्याचप्रमाणे त्यांनी तमाशा कलेला समर्थ रूप दिले. महाराष्ट्रात लोककलेची जपणूक करण्यासाठी आणि आणि तिला मान्यता मिळवण्यासाठी अण्णा भाऊंनी अतोनात प्रयत्न केले. लोकनाट्य हे नाव अण्णा भाऊंनीच दिलेले आहे. पोवाडा, वग, शाहिरी इत्यादी काव्यप्रकार अण्णा भाऊंनी नव्या ढंगाने मनामनात कोरला आहे.
त्यांच्या प्रत्येक चरित्रामध्ये गावकुसाबाहेरचे जे दलित-भटके-विमुक्त जीवन जगणारे होते. समाजामध्ये या लोकांची अवहेलना होत होती. त्यांच्या जीवनातील अनुभव, दारिद्र्य, सामाजिक परिस्थिती अण्णा भाऊंनी साहित्यातून मांडली. ‘'चलेजाव’च्या चळवळीत अण्णांनी सहभाग घेतला. याच काळात अण्णा भाऊंवर अटक वॉरंट काढण्यात आले होते. भूमिगत राहून संयुक्त महाराष्ट्र व ‘चले जाव’ चळवळ यशस्वी केली.
अण्णांच्या ‘फकिरा’ या कादंबरीमध्ये भाकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी माणसाला ज्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. माणूस म्हणून जगण्यासाठी समाजव्यवस्थेने घालून दिलेले बंधन त्यांनी अत्यंत ज्वलंत स्वरूपात मांडले आहे.
‘फकिरा’ ही कादंबरी विद्यापीठात अभ्यासाला आहे. ही कादंबरी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केली. त्यांच्या लिखाणात कार्ल मार्क्स आणि बाबासाहेब यांच्या कार्याचा प्रभाव होता. फकिरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. ही कादंबरी २७ भाषेत निर्मिती झाली. साम्यवादी विचारसरणीचा, मार्क्सवादी, बाबासाहेबांच्या चळवळीशी जुळलेला असा निष्ठावंत, लोककलाकार, लोकशाहीर, लोकांचा नेता असलेल्या अण्णांना ५० वर्षांचे आयुष्य लाभले.