लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १३ वर्षांपासून गरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू असून, २०२०च्या लाभार्थींसाठी आता ही योजना ऑनलाइन जाहीर करण्यात आली आहे. सुरेशदादा जैन शैक्षणिक व उद्योजक विकास योजना (एसडी-सीड) या अंतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातोय. दरम्यान, या योजनेतून गेल्या १३ वर्षात १४ हजारांवर विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे.
ही शिष्यवृत्ती योजना २००८ मध्ये जाहीर करण्यात आली. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेमाबाई जैन उच्चशिक्षण शिष्यवृत्ती योजनाही जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, या योजनेंतर्गत आजपर्यंत १४ हजार ३००हून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला, ४१ हजार ८०० विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रशिक्षण, १३८ संस्थांसोबत सहकार्य करार, ८४ विद्यार्थ्यांना विविध संस्थांनी शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. २३२५ युवतींना सशक्तीकरण प्रशिक्षण अशा विद्यार्थ्यांना या योजनेतून लाभ मिळाला आहे.
हे आहेत निकष
२०२०चे एसडी-सीडचे लाभार्थी विद्यार्थी, बारावीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने किमान ७० टक्के गुण, तर शहरी भागातील विद्यार्थ्यांनी किमान ७५ टक्के गुण, सीईटी, सीपीटी, नीट, जेईई परीक्षेत चांगले गुण, कुटुंबाचे उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असावे, अनाथ, दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाणार आहे. यासाठी एसडी-सीडची वेबसाइट www.sdseed.in यावर विनामूल्य अर्ज भरता येणार आहे. शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यासाठी या वेबसाइटची लिंक १५ ऑगस्टपासून ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहाणार आहे.
विविध समित्या
शिष्यवृत्ती वाटप करण्यासाठी २० सदस्यांची मार्गदर्शक समिती व दहा सदस्यांची एक निवड समिती गठित करण्यात आली आहे. मार्गदर्शक समितीत माजी प्राचार्य अनिल राव, प्राचार्य डॉ. अजित वाघ, मिलिंद कुलकर्णी, डॉ. विजय माहेश्वरी, प्रा. एस. व्ही. सोमवंशी, प्रा. डॉ. शांताराम बडगुजर, यू. डी. पाटील, प्रा. डी.टी. नेहते, प्रा. डॉ. विवेक काटदरे, प्रा. संजय दहाड, प्रा. सुरेश पांडे, डॉ. नरेंद्र जैन, डॉ. गौरी राणे, जे. टी. महाजन, पुष्पा भंडारी, शिरीष बर्वे, अजित कुचेरिया, दादा नेवे, सुभाष लोढा, उमेश सेठिया यांचा समावेश आहे, तर निवड समितीमध्ये नीलकंठ गायकवाड, प्रा. एस.एस. राणे, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी नियमावली तयार केली असून, यात डॉ. आर. एस. डाकलिया, डॉ. सुरेश अलीझाड, नंदलाल गादिया, महेश गोरडे, राजेश यावलकर, सागर पगारिया यांचा समावेश आहे. या योजनेचा गरीब, गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प प्रमुख रत्नाभाभी जैन, कार्याध्यक्षा मीनाक्षी जैन, निवड समितीप्रमुख डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी केले आहे.