जळगाव : शहरातील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या अठराव्या वर्धापन दिनानिमीत्त प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल सूर्योदय वाड्.मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
यावेळी या पुरस्कारासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.सदानंद मोरे, महाकवी सुधाकर गायधनी, माया धुप्पड, प्रा.डॉ.म.सु.पगारे, अशोक कोतवाल, अनुपमा उजगरे, डॉ.छाया महाजन, डॉ. संजीव गिरासे, डॉ. संजीवकुमार सोनवणे, शशिकांत हिंगोणेकर, ज्येष्ठ पत्रकार दिनेश दगडकर ही निवड समिती गठीत करण्यात आली होती. समितीने पुरस्कार प्राप्त व्यक्तींची नावे जाहीर केली आहेत.
असे आहेत पुरस्कार प्राप्त लेखक
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लेखक प्रेमानंद गज्वी (मुंबई) यांना दहाव्या वर्षाचा अखिल भारतीय दलिचंद जैन मराठी साहित्य भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून रुपये एकवीस हजार रूपयांचे धनादेश, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याचबरोबर प्रा.डॉ.किशोर सानप (नागपूर) यांना चौथ्या वर्षाचा अखिल भारतीय पद्मश्री भवरलालजी जैन सूर्योदय साहित्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच प्रा.डॉ.सतीश बडवे (औरंगाबाद) यांना कांताबाई भवरलाल जैन यांच्या स्मरणार्थ चौदाव्या वर्षाचा सूर्योदय सेवारत्न पुरस्कार तर लेखक तथा माजी जिल्हाधिकारी बी.जी.वाघ (नाशिक) यांना तिस-या वर्षाचा सूर्योदय साहित्य भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर बालसाहित्यिक किरण भावसार (सिन्नर) यांना सहाव्या वर्षाचा लिलाबाई दलिचंद जैन सूर्योदय बाल साहित्य पुरस्कार व ज्येष्ठ लेखिका प्रा.डॉ.चारूता गोखले (जळगाव) यांना गोकुळचंद्र लाहोटी यांच्या स्मरणार्थ सातव्या वर्षाचा सूर्योदय सेवाव्रती पुरस्कार जाहीर केला आहे.
ऑगस्टमध्ये पुरस्कार प्रदान सोहळा
पुरस्कार प्रदान सोहळा येत्या ऑगस्ट महिन्यात खान्देशातील लेखक, कवी अशोक कोतवाल यांच्या अध्यक्षतेखाली जळगावात होणार आहे. हा सोहळा दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित एक दिवसीय राज्यस्तरीय सतरावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.