जळगाव : सीआयडीने केलेल्या लेखापरिक्षणाच्या वेळी संस्थेने पुरेसे कागदपत्रे सादर केले नाहीत तसेच काही कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केल्याने कर्जाच्या थकबाकीदारांमध्ये कर्ज फेडलेल्या कर्जदारांचीही नावे समाविष्ट झालेली आहेत, त्यामुळे या कर्जदारांना त्याचा नाहकच मनस्ताप सहन करावा लागत आहे. नेमके किती लोकांनी कर्ज भरले व किती जणांचे थकीत आहे याची अद्ययावत माहितीच संस्थेच्या रेकॉर्डवर नसल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
बीएचआरमध्ये आर्थिक घोटाळा उघड झाल्यानंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये पहिला गुन्हा रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्यानंतर हळूहळू करत राज्यभर तब्बल ८१ गुन्हे दाखल झाले. गुन्हे व आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती पाहता शासनाने हे प्रकरण सीआयडीकडे सोपविले. संस्थेत नेमका अपहार किती, कशाप्रकारे झाला, ठेवीदारांच्या ठेवी कशा वळविल्या, किती कर्जदारांनी कर्ज घेतले, किती जणांनी परतफेड केली. कर्जासाठी संस्थेचे नियम, पोटनियम काय होते? संस्थेने नियमांचे पालन केले का?, संस्थेला नफा किती व तोटा किती झाला याची वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी सीआयडीने न्यायवैज्ञानिक आंतरलेखापरिक्षण केले. (फॉरेन्सीक फ्रॉड डिटेक्शन ऑडिट रिपोर्ट) ज्या संस्थेने हे लेखापरिक्षण केले, त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. अधिकार नसताना अमर्याद कर्ज वाटप, विनातारण कर्ज वाटप केले.
दरम्यान, ज्या कर्जदारांनी कर्ज घेतले व फेडले त्याबाबतचे कागदपत्रे लेखापरिक्षकांनी संस्थेकडे मागितले असता, त्यांच्याकडून जाणूनबुजून ते देणे टाळण्यात आले तर काही कागदपत्रे असूनही सादर केलेली नाहीत. असमाधानकारक उत्तरे त्यावेळी देण्यात आली. त्यामुळे जे कागदपत्रे उपलब्ध झाली, त्यावरून लेखापरिक्षण करण्यात आले. त्यात अनेक कर्जदारांच्या नावावर लाखो व कोटींची कर्ज थकीत दिसत आहेत. ‘लोकमत’ ने सीआयडीच्या लेखापरिक्षणाचा आधार घेऊन थकबाकीदारांची यादी जाहीर केली असता अनेक कर्जदारांनी कर्जफेडीचे दाखले ‘लोकमत’कडे आणून दिले. त्यावरून अनेक कर्जदारांनी कर्ज फेडले तरीदेखील त्यांच्या नावावर थकबाकी दिसत आहे, त्यामुळे या कर्जदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रवींद्र प्रल्हादराव पाटील, अभिषेक शांताराम पाटील, मुकुंद मेटकर, अतुल सुभाषचंद संघवी, नीलेश रामदास पाटील, सागर लालुराम ओझा, सुभाष मधुकर लाड, शालीग्राम पवार, रोहन सुरेश झाबड यांसह इतर अनेक कर्जदारांनी कर्ज फेडल्याचे त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रावरून दिसून येत आहे.