लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सुभाष चौक अर्बन को. ऑप क्रेडिट सोसायटीमध्ये बेनामी ठेवी आणि २३ कोटींच्या कर्जाबाबत अजय शांतीलाल ललवाणी यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीवरुन जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी या संस्थेचे या दोन मुद्द्यांवर चाचणी लेखा परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी विशेष लेखा परीक्षक वर्ग दोन पी.एफ.चव्हाण यांची नियुक्ती केली आहे.
जिल्हा उपनिबंधक बिडवई यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की,‘ अजय ललवाणी यांच्या यांच्याकडील पत्रानुसार सुभाष चौक अर्बन को. ऑफ क्रेडिट सोसायटी या संस्थेचे चाचणी लेखा परीक्षण करण्याचे निश्चित करण्यात येत आहे. यात दोन मुद्दे आहेत. संस्थेच्या संचालकांनी पदाचा गैरवापर करून कर्जाच्या नावाखाली श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांना ५.७५ कोटी आणि श्री श्री डेव्हलपर्स यांना १७.२५ कोटी रुपये बेकायदेशीर वर्ग करण्यात आले. आणि संस्थेकडे जमा असलेल्या बेनामी ठेवीदारांच्या ठेवींची चौकशी या दोन मुद्द्यांची चौकशी करण्यासाठी चाचणी लेखा परीक्षण करणे आवश्यक असल्याची खात्री झाल्याने आदेश दिले आहेत.’ यानुसार विशेष लेखा परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.