लोकमत न्यूज नेटवर्क
धरणगाव : शहरासह जिल्हाभरात चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या एका टोळीचा धरणगाव पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला होता. याप्रकरणी धरणगाव पोलिसांनी अटक केलेल्या ५ आरोपींकडून २० दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. पोलिस तपासात या चोरट्यांनी आणखी ११ मोटार सायकल काढून दिल्यामुळे आतापर्यंत एकूण ३१ मोटार सायकल जप्त करण्यात झाल्या आहेत. या टोळीतील तीन चोरट्यांना चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बोरगाव, ता. धरणगाव येथील जयेश पाटील याच्याकडे एकाच क्रमांकाच्या दोन मोटरसायकल आहे, अशी गुप्त बातमी पोलिस निरिक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्याने पोउपनि अमोल गुंजाळ तसेच पोलिस कर्मचारी खुशाल पाटील, मोती पवार, दिपक पाटील, गजेद्र पाटील, वसंत कोळी पोलिसांनी याठिकाणी जावुन खात्री केली. त्यानंतर या टोळीचा पर्दाफाश झाला.
याप्रकरणी भुषण धनराज पाटील, अमोल नाना पाटील भूषण विजय पाटील (पळासखेडा सिम ता. पारोळा), जयेश रविद्र चव्हाण (रा. जवखेडा ता.अमळनेर), ज्ञानेश्वर राजेद्र धनगर (रा. वर्डी ता चोपडा) यांच्यामार्फत सामान्य लोकांना विक्री करत होते.
दरम्यान, या दुचाकी चोरट्यांना आज तीन दिवसांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले होते. या चोरट्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. भूषण धनराज पाटील, अमोल नाना पाटील यांना ताब्यात घेवून त्यांची सखोल विचारपुस केली असता त्यांनी चिंचपुरा ता. धरणगाव, चोपडा, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, शिरपुर अशा अनेक ठिकाणी मोटरसायकल चोरी करुन त्या विकल्याचे सांगितले. या आराेपींकडून यापूर्वी २० दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या आता आणखीन ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण दुचाकींची संख्या ३१ झाली आहे.