लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : बनावट तंबाखू प्रकरणात आणखी एकाला पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. त्या आरोपीचे नाव फारुख ऊर्फ अकू याकूब शेख (३६, पिरमुसा कादरीनगर हुडको, चाळीसगाव ) असे असून, पोलिसांनी बुधवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. या बनावट कटात तो सामील असल्याचे पोलीस चौकशीत उघडकीस आले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी सापडण्याची शक्यता बळावली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील पोलीस कोठडीतील आरोपी इरफान अक्रमबेग मिर्झा व रिजवान शेख नजीर या दोघांनाही न्यायालयात हजर करून या आरोपींना न्यायालयीन कोठडी द्यावी, असा अर्ज पोलिसांनी केला होता. न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब करून अर्ज मंजूर केला. यानंतर या दोघा आरोपींनी वकिलामार्फत जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला. त्यावेळी फिर्यादी नवीनभाई हरियानी यांच्यावतीने ॲड. सागर पाटील यांनी जामीन अर्जावर जोरदार हरकत घेऊन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावण्याची मागणी न्यायालयात केली. न्यायालयाने त्या दोघांचा जामीन अर्ज नामंजूर केला.
चाळीसगावच्या व्ही. एच. पटेल आणि कंपनीच्या ब्रॅण्ड नेमच्या एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या बनावट तंबाखूच्या भरलेल्या बारा गोण्या रविवारी रात्री शहरातील हुडको कॉलनीतील पिरमुसा कादरी नगरातून पोलिसांनी जप्त केल्या होत्या. जप्त केलेल्या तंबाखूच्या लहान व मोठ्या पुड्यांवर उत्पादक व्ही. एच. पटेल आणि कंपनी असे प्रिंट असलेले लेबलवर या कंपनीचा ट्रेडमार्क व जीएसटी नंबर होता. आरोपींकडे लेबल कसे आले व हे लेबल कोणत्या प्रिंटींग प्रेसमध्ये छापले. त्या प्रेसमालकाचीही चौकशी होणार असल्याचे समजते. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सय्यद पुढील तपास करीत आहेत.