जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ते २०२८-२९ या पाच वर्षांचा बृहत विकास आराखडा तयार केला आहे. त्याला अनुसरून शैक्षणिक सत्र २०२४-२५ साठी नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी इच्छूक संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या आराखड्यात पारंपरिक अभ्यासक्रमांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांचा देखील समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागात स्वतंत्र महिला महाविद्यालय, रात्रकालीन महाविद्यालय, विधी व बीएस्सी फॅशन डिझायनिंगचे महाविद्यालय प्रस्तावित करण्यात आले आहे. याचे प्रस्ताव दि. ३० सप्टेंबर किंवा त्यापूर्वी संलग्नता विभागात सादर करायचे आहेत. महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाच्या तज्ज्ञ समितीच्या शिफारसी, माहेडची मंजुरी आणि नवीन मान्यतांसाठी आवश्यक निकषांच्या आधीन राहून पात्र अर्जांचा विचार केला जाणार असल्याचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी म्हटले आहे.
महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या अटी व शर्तींची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. पारोळा तालुक्यात एक नवीन महिला महाविद्यालय प्रस्तावित आहे.
बी.कॉमचे १, तर बी.ए.ची १६ महाविद्यालयेजळगाव जिल्ह्यात अमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा, यावल तालुक्यात कला अभ्यासक्रमाची एकूण १६ नवीन महाविद्यालये प्रस्तावित करण्यात आली आहे. वाणिज्य शाखेचे १ नवीन महाविद्यालय अमळनेरमध्ये प्रस्तावित आहे.