जळगाव : दुचाकीने कंपनीत जात असताना वाळूच्या डंपरने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या अक्षय विजय पाटील (३०,रा.शिवम नगर, निमखेडी परिसर) या रेमंड कंपनीच्या कर्मचाऱ्याचा गुरुवारी उपचार सुरु असताना खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.
९ मार्च रोजी सकाळी साडे आठ वाजता महामार्गावर इच्छा देवी चौकात हा अपघात झाला होता. त्यात दुचाकीवर मागे बसलेले सिध्दार्थ त्र्यंबक मोरे (५७,रा.सिंधी कॉलनी) हे जागीच ठार झाले होते तर दुचाकीस्वार अक्षय गंभीर झाला होता. तब्बल दहा दिवस त्याने मृत्यूशी झुंज दिली.
दरम्यान, अक्षय लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झालेले आहे. तो एकटा असल्याने आईचा वृध्दापळातच आधार हिरावला गेला. या घटनेमुळे पत्नी व आईने प्रचंड आक्रोश केला. खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह आणण्यात आला होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. दरम्यान, या अपघात प्रकरणी डंपर चालक धीरज मोहन धनगर (१८,रा.कडगाव, ता.जळगाव) याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सिध्दार्थ मोरे यांच्या दहाव्याच्या दिवशी अक्षयची प्राणज्योत मालवली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.