जळगाव : वाढत्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग दिला जात असून यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे आणखी एक लसीकरण केंद्र मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे लवकरच सुरू करण्यात येणार आहे. प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. यासोबतच सशुल्क लसीकरण केंद्र वाढविण्याचाही विचार सुरू असून जिल्ह्यातील आरोग्य उप केंद्रांमध्येही लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.
गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर वर्षभर ज्या लसीची वाट पाहिली जात होती अखेर ती कोरोना प्रतिबंधक लस आली व १६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षांवरील इतर आजार असलेल्या व्यक्तींनाही लसीकरण सुरु करण्यात आले. यासोबतच याच महिन्यात खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरणास सुरुवात झाली. दरम्यान कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नागरिकांचा यापासून बचाव व्हावा यासाठी अधिकाधिक लसीकरण कसे करता येईल यासाठी प्रशासनाच्या वतीने लसीकरणाला वेग दिला जात आहे.
यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे लसीकरण केंद्र रेडक्रॉस सोसायटीमध्ये सुरू केल्यानंतर आता आणखी एक केंद्र मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य पथकास प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. याशिवाय आणखी चार खाजगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे.
चार ते पाच हजार लोकसंख्येच्या ठिकाणी सुरू करणार लसीकरण
जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरण सुरू आहे. ग्रामीण भागातही हे लसीकरण वाढावे यासाठी नियोजन केले जात आहे. जिल्ह्यात दररोज साधारण दोन ते अडीच हजार जणांना लस दिली जात आहे. यामध्ये आतापर्यंत ७४ हजार ७२४ जणांना पहिला डोस देण्यात आला असून १० हजार ५४५ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. दररोजची लसीकरणाची संख्या वाढावी यासाठी जेथे चार ते पाच हजार लोकसंख्या आहे, अशा आरोग्य उपकेंद्रांवर देखील लसीकरण सुरू करण्याचे प्रशासनाच्या वतीने नियोजन सुरू आहे. लसीकरणाचा वेग जेवढा वाढेल तेवढा कोरोना नियंत्रणास हातभार लागेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सशुल्क केंद्रही वाढविणार
१ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील इतर आजार असलेल्या व्यक्तींना लसीकरण सुरू झाले. सोबतच खासगी रुग्णालयातही लसीकरण सुरू झाले आहे. आता खाजगी रुग्णालयातील सशुल्क लसीकरण केंद्र वाढविण्याचा देखील विचार सुरू असून अधिकाधिक केंद्र सुरू करण्यावर भर दिला जात आहे. मात्र हे करीत असताना प्रत्येक ठिकाणी लसीकरणाच्या नियमावलीनुसार जागा, कर्मचारी, आवश्यक सुविधा आहे की नाही याचाही आढावा घेतला जात आहे.
---------------
कोरोना प्रतिबंधक लस अधिकाधिक व्यक्तींना दिली जावी यासाठी लसीकरण केंद्र वाढविले जात आहे. यात जिल्ह्यातील आणखी चार केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून रोटरी भवन येथे देखील लवकरच लसीकरण केंद्र सुरू होईल. यासोबतच ज्या ठिकाणी चार ते पाच हजार लोकसंख्या आहे तेथे देखील लसीकरण सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे.
- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक