जळगाव : मुख्य रस्त्यालगत असलेल्या व्यापारी आणि भूखंडधारकांनी खुल्या सोडावयाच्या समोरील सामासिक अंतरात ओटे बांधलेले आहेत, त्यांनी ते सात दिवसात हटवावेत अन्यथा अतिक्रमण विभागाकडून ते हटवण्यात येतील, अशी नोटीस पालिका आयुक्तांनी बजावली असून त्यामुळे अतिक्रमणविरोधी मोहीम पुन्हा सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत.काही ठिकाणी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवल्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली आहे. आता रस्त्यालगतच अतिक्रमण करणाऱ्या व्यापारी आणि भूखंडधारकांना पुन्हा पालिकेने जाहीर नोटीसीव्दारे इशारा दिला आहे. या नोटीसीनुसार बांधकामपासून १.२०मीटरपर्यंतच्या जागेचाच वापर करता येईल. त्याव्यतिरिक्त ओटा, रेलिंग, बॅरागेट्स, टिनशेड आदी कोणतेही कच्चे व पक्के बांधकाम केले असल्यास ते काढून टाकावे. अशा अतिक्रमणामुळे दुकानात येणाºया ग्राहकांची वाहने सार्वजनिक रस्त्यावर उभी करावी लागतात व त्यामुळे वाहतूक कोंडी होते. अशा अनधिकृत बांधकामांवर आता कारवाई करण्याचे संकेत मनपा आयुक्तांनी दिले आहेत. ही अतिक्रमणे व्यापारी व भूखंडधारकांनी स्वत:हून काढून टाकावीत, अन्यथा अतिक्रमण विभागाकडून ती हटवण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
अतिक्रमणविरोधी मोहीम पुन्हा जोर धरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 9:52 PM