लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तिसऱ्या सिरो सर्व्हेत आरोग्य कर्मचाऱ्यांचीही ॲन्टीबॉडी तपासणी करण्यात आली होती. यात १०३ कर्मचाऱ्यांपैकी २३ कर्मचाऱ्यांच्या रक्तात कोरोनाशी लढणाऱ्या ॲन्टीबॉडीज आढळून आल्या आहेत. हे प्रमाण २२. ३ टक्के आहेत. दरम्यान, एकत्रित सिरो सर्व्हेत सांगलीनंतर जळगावात सर्वाधिक नागरिकांमध्ये ॲन्टीबॉडिज आढळून आल्या आहेत. आयसीएमआरने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
जळगावात वीस हजारांच्या आसपास आरोग्य कर्मचारी आहेत. सिरो सर्व्हे नुसार यातील साडेचार हजार कर्मचाऱ्यांना कोरोना होऊन त्यांच्या शरीरात या ॲन्टीबॉडी तयार झाल्या आहेत. सामान्यांच्या तुलनेत हे प्रमाण त्या मानाने कमी आहे. डिसेंबर महिन्यात आयसीएमआरच्या पथकाने जिल्ह्यात हा तिसरा सिरो सर्व्हे केला होता. यात प्रथमच १०३ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रक्ताचे नमुने संकलीत करण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्याच्या तिसऱ्या सिरो सर्व्हेच्या निष्कर्षांनी आरोग्य यंत्रणा बुचकळ्यात पडल्याचे चित्र होते. एकत्रित तपासण्या व परिस्थितीवरून जिल्ह्यात ५० ते ५५ टक्के संसर्ग असेल असे काही तज्ञांचे मत आहे. मात्र, सिरो सर्व्हेत केवळ तीन टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.