आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगावसह सहा जिल्ह्यांमध्ये झालेल्या चौथ्या सिरो सर्व्हेचा अहवाल समोर आला आहे. अजूनही ५१ टक्के नागरिकांमध्ये ॲन्टिबॉडिज् आढळून आल्या आहेत. यात ४१४ रक्तनमुने संकलीत करण्यात आले होते. त्यापैकी २११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, दुसऱ्या लाटेतील बाधितांचे प्रमाण पाहता अद्यापही हर्ड इम्युनिटी विकसीत झाली नसल्याने अद्यापही निम्म्या जळगावकरांना धोका कायम असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
कोविडशी लढणाऱ्या ॲन्टिबॉडिज किती लोकांमध्ये विकसीत झाल्या आहेत, याची तपासणी करण्यासाठी सिरो सर्व्हे केला जातो. त्यानुसार काही ठरावीक भागातून रक्त नमुने संकलीत करून त्यांची चेन्नई येथे तपासणी केली जाते. यातून कोरोनाच्या संसर्गाच्या प्रमाणाचा अंदाज बांधून पुढील धोरण ठरविता येतात. दरम्यान, जून महिन्यात झालेल्या या चौथ्या सर्व्हेत ५१४ रक्तनमुने संकलीत करण्यात आले होते. यात प्रथमच बालकांचेही रक्तनमुने घेण्यात आले होते. मात्र, बालकांचा स्वतंत्र अहवाल प्राप्त झालेला नसून त्यांच्यातील ॲन्टिबॉडिजचे प्रमाण अद्याप समोर आलेले नाही. जिल्ह्यातून ४० बालकांचे नमुने घेण्यात आले होते.
या आधी तीन सिरो सर्व्हे
१ जिल्ह्यात या आधी तीन सिरो सर्व्हे करण्यात आले आहेत. त्यात पहिल्या सर्व्हेत ०.५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले होते.
२ दुसरा सर्व्हे हा जानेवारी महिन्यात झाला होता. त्यात २५ टक्के नागरिकांमध्ये ॲन्टिबॉडिज् आढळून आल्या होत्या.
३ तिसरा सर्व्हे हा ऑगस्ट महिन्यात झाला होता. त्यात २८ टक्के नागरिकांमध्ये ॲन्टिबॉडिज् आढळून आल्या होत्या. मात्र, दुसऱ्या सिरो सर्व्हेच्या तुलनेत कमी वाढ नोंदविण्यात आल्याने हर्ड इम्युनिटीचा अंदाज चुकला होता. दरम्यान, चौथ्या सिरो सर्व्हेत आता २३ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
८९ टक्के आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह
जिल्ह्यातील १०० आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी ८९ कर्मचाऱ्यांमध्ये ॲन्टिबॉडिज् आढळून आल्या आहेत. गेल्यावेळेच्या तुलनेत या लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. यात लसीकरणाचा प्रभाव असू शकतो, असाही काही तज्ञांचा अंदाज आहे. हेल्थकेअर वर्करचे लसीकरण झाले असल्याने त्यांच्या शरीरात या ॲन्टिबॉडिज् आढळून आल्या असण्याची शक्यता आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील १०० जणांचे नमुने घेण्यात आले होते.
कोट
रक्तनमुने घेतलेल्या ५१ टक्के लोकांमध्ये कोविडशी लढणाऱ्या ॲन्टिबॉडिज् आढळून आल्या आहेत. हर्ड इम्युनिटीबाबत सांगता येणार नाही, मात्र गेल्या सिरो सर्व्हेच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. शिवाय केवळ ४०० लोकांवरून ४० लाख लोकसंख्येचा अंदाज बांधता येणार नाही. कदाचित हे प्रमाण ७५ टक्के असू शकते. - डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक
ग्राफ करावा
पहिला सिरो सर्व्हे : ०.५ टक्के
दुसरा सिरो सर्व्हे : २५.९ टक्के
तिसरा सिरो सर्व्हे : २८.० टक्के
चौथा सिरो सर्व्हे : ५१ टक्के