लाेकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रेल्वेस्टेशनवर परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची अँटिजन चाचणी करण्यात येत असून, दोन दिवसांत पाच प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या ९६ प्रवाशांच्या हातावर होम क्वाॅरंटाइनचे शिक्के मारून त्यांना १४ दिवस घरी राहण्याच्या सूचना करण्यात आल्या.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने, जिल्हा प्रशासनातर्फे केरळ, गोवा, राजस्थान, दिल्ली व उत्तराखंड या राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची अँटिजन चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन दिवसांपासून जळगाव रेल्वेस्टेशनवर मनपाच्या आरोग्य विभागाच्या पथकातर्फे परराज्यातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची अँटिजन चाचणी करण्यात येत आहे. रेल्वेस्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळच हे पथक तैनात करण्यात आले असून, प्रत्येक प्रवाशाची या ठिकाणी नोंद करण्यात येत आहे. अँटिजन चाचणी केल्यानंतर त्या प्रवाशाला त्या ठिकाणीच थांबवून दहा ते पंधरा मिनिटांत अँटिजन चाचणीचा रिपोर्ट देण्यात येत आहे.
इन्फो :
दोन दिवसांत आढळले पाच बाधित
स्टेशनवर करण्यात आलेल्या अँटिजन चाचणीत दोन दिवसांत पाच प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामध्ये शुक्रवारी आग्रा येथून आलेला एक प्रवासी कोरोनाबाधित आढळला. त्या प्रवाशाला तात्काळ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तसेच शनिवारी भोपाळहून आलेले दोन प्रवासी, दिल्लीहून एक तर मुंबईहून आलेला एक प्रवासी कोरोनाबाधित आढळून आला आहे. या सर्वांना शहरातील विविध ठिकाणच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले असल्याचे जळगाव रेल्वेस्टेशनचे प्रबंधक एस. डी. सानप यांनी सांगितले.