अमित महाबळ, जळगाव: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना उद्योग, व्यवसायात इंटर्नशिप करणे बंधनकारक करण्यात आले असून, या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कोणते कपडे परिधान करावेत, वर्तणूक कशी असावी याचे निर्देश कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने जारी केले आहेत. इंटर्नशिप दरम्यान कसेही कपडे परिधान करण्यास मनाई असून, औपचारिक ड्रेस कोड किंवा गणवेश परिधान करावा लागणार आहे.
गेल्या शैक्षणिक सत्रापासून विद्यापीठ संलग्न स्वायत्त महाविद्यालये आणि प्रशाळांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहे. आता ते २०२४-२५ पासून उर्वरित सर्वच महाविद्यालयांमध्ये लागू होईल. यामध्ये अभ्यासक्रमाचा पूर्वापार आराखडा बदलण्यात आला असून, प्रात्यक्षिक ज्ञानावर भर आहे. विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करणे आवश्यक असणार आहे. ही प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून प्रत्येक महाविद्यालयात प्लेसमेंट अधिकारी नियुक्त करण्यास सांगण्यात आले आहे. इंटर्नशिपच्या ठिकाणी काम करताना विद्यार्थ्यांनी काय करावे आणि काय करू नये याचे निर्देशही विद्यापीठाकडून जारी करण्यात आले आहे. त्याचे मूल्यमापन होणार असून, त्यावर आधारित गुणही दिले जाणार आहे.
नियम पाळावे लागतील...
इंटर्नशिप दरम्यान कसेही कपडे परिधान करण्यास मनाई राहील. त्यामुळे औपचारिक ड्रेस कोड किंवा गणवेश परिधान करावा लागेल. आस्थापनेचे सुरक्षा नियम, आचारसंहिता यांचे पालन विद्यार्थ्यांना करावे लागेल. आस्थापनेशी संबंधित कोणतीही महत्वाची किंवा संवेदनशील माहिती आपल्या अहवालात प्रकाशित करण्यापूर्वी संबंधितांची मंजुरी घ्यावी, असेही विद्यापीठाने महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.