जळगाव : चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन येथील कार्यरत व माजी कर्मचा-यांनी भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) देय रकमेच्या निश्चितीसाठी संस्थेमध्ये नोकरी करीत असल्याचा पुरावा सादर करण्याचे आवाहन कर्मचारी भविष्य निधीच्या सहायक भविष्य निधी आयुक्तांनी केले आहे.
या विषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, संस्थेत कार्यरत व माजी कर्मचा-यांच्या वेतनामधून भविष्य निर्वाह निधीचे अंशदान कपात करण्यात आलेले नाही. कर्मचा-यांच्या देय रकमेच्या निश्चितीसाठी चौकशी सुरू आहे. तसेच पात्र कर्मचारी मात्र ज्यांना पीएफचे सदस्यत्व प्रदान करण्यात आलेली नाही, त्यांनी संस्थेत नोकरी करीत असल्याचा पुरावा सादर करावा, असे पत्रकात म्हटले आहे. तसेच ज्यांचे वेतन वैधानिक मर्यादेच्यावर असल्याने त्यांना योजनेतून विमुक्त कर्मचारी श्रेणीत ठेवले आहे, जे कर्मचारी या संस्थेत सामील होण्यापूर्वी इतर कोणत्याही संस्थेतील भविष्य निर्वाह योजनेचे सदस्य असतील त्यांनी मागील पीएफ सदस्यत्वाचे प्रमाणपत्र सादर करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.