लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या गुरुवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल दाखल होणार आहेत. शिवसेनेने महापौरपदासाठी जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांचे नाव निश्चित केले आहे. मात्र भाजपने अद्यापही महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नसून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी भाजप आपला उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महापौर व उपमहापौर पदासाठी च्या निवडणुकीआधीच भाजपमध्ये पडलेल्या फुटी मुळे निवडणूक चुरशीची झाली आहे. शिवसेनेने आपल्या सर्व नगरसेवकांना व्हीप बजावून जयश्री महाजन व कुलभूषण पाटील यांना मतदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर भाजपने देखील सर्व नगरसेवकांना व्हीप बजावून पक्षाकडून देण्यात येणाऱ्या उमेदवाराला मतदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पक्षाच्या उमेदवारा व्यतिरिक्त इतर पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्यास संबंधित नगरसेवकांवर कारवाईचा इशारा देखील भाजपने दिला आहे. भाजपकडून प्रतिभा कापसे व दीपमाला काळे यांचे नाव महापौर पदासाठी सर्वात आघाडीवर आहे. तर उपमहापौरपदासाठी अद्यापही कोणत्याही नावावर चर्चा झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.