जळगाव : मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतमधील मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जातवैधता प्रमाणपत्र नाही अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांस प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. १ ऑगस्टपासून जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावयाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आलेला आहे. जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज www.bartievalidity.maharashtra.gov.in या वेबपोर्टलवर परिपूर्ण भरल्यानंतर आवश्यक दस्तऐवज अपलोड करून ऑनलाइन सबमिट करावयाचे आहे. त्यानंतर त्यांची प्रिंट घेऊन पूर्वीप्रमाणे विहित कार्यपद्धती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत समिती कार्यालयाकडे प्रत्यक्ष सादर करावे लागेल.
हस्तलिखित पत्र स्वीकारले जाणार नाही...
जुन्या पद्धतीने हस्तलिखित स्वरूपातील अर्ज समिती कार्यालयात स्वीकारले जाणार नाहीत, असेही जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सुरेश पाडवी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.