जळगाव : महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत नॉन कोविड रुग्णांसाठी असलेल्या उपलब्ध खाटांचे व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांची नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी १९ मार्च रोजी काढले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात असून रुग्णालयांमध्येही उपाययोजना केल्या जात आहेत.
कोरोनाचा हा वाढता संसर्ग पाहता नॉन कोविड रुग्णांचीही गैरसोय होऊ नये म्हणून खाटांचे नियोजन केले जात आहे. यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत नॉन कोविड रुग्णांसाठी रुग्णालयातील उपलब्ध खाटांविषयी माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेत व्हीसी रूम सुरू करून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत असलेल्या रुग्णालयातील उपलब्ध खाटांबाबतचे व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांची नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहेत.
कोणताही रुग्ण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये
नियुक्त नियंत्रक अधिकारी जिल्हा परिषदेतील व्हीसी रूम, या ठिकाणी नियुक्त कर्मचाऱ्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवणार आहे. तसेच नियंत्रक अधिकाऱ्यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत असलेल्या रुग्णालयातील उपलब्ध खाटांबाबतचे व्यवस्थापन करून कोणताही रुग्ण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत कार्यवाही करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत. या कामकाजासाठी कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.