लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्यनिर्मितीसाठी अनुदान योजनेतंर्गत नाट्य परीक्षण समितीची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. या समितीत ‘परिवर्तन’चे अध्यक्ष शंभू पाटील यांचा खान्देशातून एकमेव नाट्यकलावंत म्हणून समावेश आहे.
शासनाकडून नाट्यकलेला वाव मिळावा यासाठी काही नाटकांना अनुदान दिले जाते. या वेगळ्या धाटणीचा नाटकांची निवड या समितीकडून केली जात असते. समितीत राज्यभरातून २२ जणांची निवड करण्यात आली आहे. ही निवड तीन वर्षांसाठी करण्यात आली असून, २२ जानेवारी रोजी शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. शहरातील परिवर्तन संस्था ही गेल्या दहा वर्षांपासून राज्यभरात नाटकाला वेगळी ओळख निर्माण करुन देण्याचा प्रयत्न करत आहे. परिवर्तनच्या दशकपुर्तीच्या पार्श्वभूमीवर शासनाने शंभू पाटील यांची या समितीवर निवड करून, परिवर्तन संस्थेचा एकप्रकारे गौरव केला आहे. दरम्यान, शासनाने याबाबतचे परिपत्रक काढले असून, शासनाकडून या निवडीबाबत कोणतेही अधिकृत पत्र प्राप्त झाले नसल्याचे शंभू पाटील यांनी सांगितले.