ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 16 - जिल्हा परिषद गट व गणासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून रविवारी केंद्रनिहाय याद्या प्राप्त झाल्या. मात्र उमेदवारांकडे गट व गणनिहाय याद्या आहेत. त्यामुळे काही प्रमाणात संभ्रमाचे वातावरण होते. मात्र जळगाव तहसीलदार अमोल निकम यांनी ज्या ठिकाणी संभ्रमाचे वातावरण आहे त्या ठिकाणी तलाठी नियुक्त केले आहेत. त्यामुळे आव्हाणे व नशिराबाद येथील मतदान पुन्हा सुरळीत सुरु झाले आहे.
उमेदवारांकडे मतदारांची जिल्हा परिषद गट व गणनिहाय यादी होती. त्यानुसार उमेदवारांनी मतदारांना या यादीतील अनुक्रमांक व मतदान केंद्रक्रमांकाची माहिती पुरवली आहे. मात्र रविवारी निवडणूक आयोगाकडून केंद्रनिहाय याद्या प्राप्त झाल्या आहेत. तहसीलदारांनी उमेदवारांना सुधारित याद्या घेऊन जाण्याबाबत आवाहन केले होते.
काही गावातील उमेदवारांनी या न नेल्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर तहसीलदार अमोल निकम यांनी नशिराबाद, आव्हाणे व शिरसोली येथे तलाठी नियुक्त करत मतदारांना अनुक्रमांक व मतदान केंद्र क्रमांक काढून देण्याची सुचना केली आहे.
तहसीलदारांनी या तिन्ही गावांना भेट देवून पाहणी करीत कोणत्याही मतदाराला मतदानापासून वंचित ठेवू नये अशी सुचना केंद्रप्रमुखांना केली आहे. त्यामुळे दुपारी १२ वाजेनंतर या तिन्ही केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु झाल्याचे तहसीलदार अमोल निकम यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.