लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात आणखी पाच ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांना सोमवारी प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली. यासह दोन ठिकाणी ऑक्सिजन टँक उभे राहणार असल्याने आगामी तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची गरज बऱ्यापैकी स्थानिक पातळीवरच पूर्ण होणार असल्याचे डॉ.एन.एस. चव्हाण यांनी सांगितले.
या आधी मोहाडी रुग्णालय चोपडा, मुक्ताईनगर जामनेर, चाळीसगाव या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे राहत आहेत. त्यानंतर आता रावेर, पारोळा, अमळनेर, भडगाव आणि धरणगाव याठिकाणी ४०० लिटर प्रतिमिनिट इतक्या क्षमतेने ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. साधारण ७५ ते १०० जम्बो सिलिंडर दिवसाला यातून ऑक्सिजन निर्मिती होणार आहे.
या ठिकाणी टँक
जिल्हा नियोजन समितीकडून मोहाडी रुग्णालय व चोपडा येथील ग्रामीण रुग्णालयासाठी लिक्विड ऑक्सिजन टँक होणार आहे. यात मोहाडी रुग्णालयात २० मेट्रिक टन तर चोपडा येथे १३ मेट्रिक टनचा हा टँक राहणार आहे. या आधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २० मेट्रिक टनचा टँक कार्यान्वित आहे.