ॲड. आनंद भंडारी यांनी खंडपीठात तृतीयपंथी अंजली पाटील यांच्या वतीने बाजू मांडली. तृतीयपंथी व्यक्ती अधिकार संरक्षण कायदा २०१९ नुसार लिंग निवडण्याचा अधिकार तृतीयपंथी व्यक्तीला आहे, या बाबीकडे ॲड. भंडारी यांनी लक्ष वेधले. त्यानुसार खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी अंजली यांच्या बाजूने निकाल देत त्यांचा निवडणूक अर्ज स्त्री राखीव प्रवर्गातून मान्य असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, उमेदवारी अर्जासंदर्भात अंजली पाटील यांच्या बाजूने खंडपीठाने निर्णय दिला खरा; परंतु, भविष्यात त्यांना पुरुष म्हणून कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. तशी सवलत मिळण्यास त्या पात्र राहणार नाहीत, असेही निकाल देताना न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
भादली बुद्रुक येथील अंजली पाटील (गुरू संजना जान) या तृतीयपंथीने ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांसाठी राखीव असलेल्या प्रवर्गातून आपली उमेदवारी दाखल केली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावापुढे लिंगाचा उल्लेख ‘इतर’ असा असल्याने, त्यांना महिला राखीव प्रवर्गातून उमेदवारी दाखल करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर अंजली पाटील यांचे समाधान झाले नव्हते. त्यांनी आपली उमेदवारी वैध असून चुकीच्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज बाद केल्याचा आरोप केला होता. आपल्याकडे केंद्र सरकारने दिलेले आधार कार्ड तसेच मतदान कार्डावर तृतीयपंथी असा उल्लेख आहे. याशिवाय आपल्याकडे सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्रदेखील असल्याने महिला राखीव प्रवर्गातून आपली उमेदवारी योग्य असल्याचा दावा त्यांनी केला होता.