लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने त्याचा परिणाम ऋतूमानावरदेखील होताना दिसत आहे. यावर्षी जिल्ह्यात हिवाळा केवळ नावालाच होता, मात्र यंदाचा उन्हाळा त्यातल्या त्यात एप्रिल महिना जिल्हावासीयांसाठी चांगलाच तापदायक ठरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
यावर्षी मार्च महिन्यापासूनच तापमानात प्रचंड वाढ होत आहे. मार्च महिन्यातच तापमानाने चाळीशी पार केली आहे. सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. एप्रिल महिन्यात तापमान ४५ अंशापेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यासह एप्रिल महिन्याच्या मध्यात जिल्ह्यात काहीअंशी ढगाळ वातावरण निर्माण होऊन अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, हे चार-पाच दिवस सोडून एप्रिल महिन्यात तापमान चांगलेच वाढणार आहे. यंदा मे महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात तापमान सर्वाधिक राहण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात गेल्या काही वर्षांच्या तुलनेत तापमानाच्या सरासरीत दोन अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
मागील आठवड्यातील तापमान
तारीख - कमाल - किमान
३१ मार्च - ४१ - २२
३० मार्च - ४० - २३
२९ मार्च - ४१ - २३
२८ मार्च - ३९ - २२
२७ मार्च - ४० - २१
असा राहील पुढील आठवडा
तारीख -कमाल - किमान
२ एप्रिल - ४२ - २२
३ एप्रिल - ४२ - २३
४ एप्रिल - ४३ - २३
५ एप्रिल - ४३ - २५
६ एप्रिल - ४२ - २४