अपूर्ण पुरवठा : आठवड्यातून कधीतरी मिळते लस
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : प्राथमिक आरोग्य केंद्रासह कार्यक्षेत्रातील उपकेंद्रातही लसीकरणाची व्याप्ती वाढविण्याच्या उद्देशाने परिसरात नुकतीच कोविड लस उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, आठवड्यातून कधीतरी एकदा लस मिळत असल्याने कोविड लसीकरणाला आता खीळ बसली आहे. त्याबद्दल सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.
धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४५ वर्षे वयावरील नागरिकांना सुरुवातीपासून लस दिली जात आहे. मोठे कार्यक्षेत्र लक्षात घेता आरोग्य केंद्रातच लसीकरण सत्र न राबविता अन्य गावांतील उपकेंद्रात लस देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी केली होती. ‘लोकमत’नेही त्यासंदर्भात वृत्त प्रकाशित करून पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर उशिरा का होईना ममुराबाद व मोहाडी येथे कोविड लसीकरण सुरू झाले. स्थानिक पातळीवर लस उपलब्ध झाल्याचे पाहून ग्रामस्थांमध्येही उत्साहाचे वातावरण होेते. मात्र, एक दिवस लसीकरण झाल्यानंतर दुसऱ्यांदा कधी लस येते, याची वाट पाहून ग्रामस्थ आता हताश झाले आहेत. लस मिळण्याच्या आशेवर अनेकजण उपकेंद्रात दररोज येऊन बसत असल्याचेही दिसून आले आहे.
-----------------
(कोट)...
जिल्हास्तरावरून वितरित होणारी कोविड प्रतिबंधक लस सर्व तालुक्यांना सरसकट मिळत नाही. त्यामुळे बऱ्याचवेळा थोडा उशिराने लस साठा उपलब्ध होतो. मात्र, लस संख्या जास्त राहत असल्याने एकावेळी अनेकांना त्याचा लाभ मिळतो.
- डॉ. संजय चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी, जळगाव