- जिल्ह्याचे एकूण क्षेत्र -८,१०,५०७ (हेक्टर)
-गेल्यावर्षी पेरणी झालेले क्षेत्र - ७, ७५, ५५०
- यावर्षी पेरणीचा अंदाज - ७,७७,३४७
- यंदा कापसाची पेरणीचा अंदाज - ५, लाख, ३५ हजार हेक्टर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षीही मान्सून सरासरी इतका राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे बळीराजाने खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे. यावर्षी कापसाच्या लागवड क्षेत्रात ५ टक्क्यांची वाढ होण्याचा तर मक्याच्या लागवड क्षेत्रात मात्र यावर्षी पाच ते सहा हजार हेक्टरने घट होण्याचाही अंदाज कृषी विभागाकडून प्राथमिक स्तरावर व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत चार ते पाच टक्के खरीपाची पेरणी होणार आहे.
कृषी विभागाने खरीप हंगामासाठी पीक, पेरणी, बी-बियाणे आणि खतांचे नियोजन पूर्ण केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षाच्या तुलनेत चार ते पाच टक्के पिकाखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी देखील कृषी विभागाने बियाणे व खतांबाबत नियोजन आखले होते. मात्र ऐन वेळी साठेबाजी मुळे शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी ताटकळत बसावे लागले होते.
३ हजार हेक्टर क्षेत्र वाढणार
गेल्या वर्षी दोन वर्षांपासून जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर या काळातील नियमितच्या सरासरीपेक्षा १३० ते १४५ टक्के पाऊस झाला होत आहे. त्यातच परतीच्या पावसामुळे गेल्या दोन वर्षांपासून खरीप हंगामाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यंदा स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने जिल्ह्यात ९८ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. कृषी विभागाने खरिपाच्या नियोजनात लागवडीखालील क्षेत्रात वाढ पाच टक्के वाढ केली आहे. खरिपासाठी गेल्या वर्षाच्या ७ लाख ७५ हजार ५५० हजार १४९ हेक्टरमध्ये वाढ करून यंदा ७ लाख ७८ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात एकूण क्षेत्र ८ लाख १० हजार ५०७ हेक्टर क्षेत्र आहे. दरवर्षी, सरासरी ७ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होत असते.
५ लाख हेक्टरवर होणार कापसाची पेरणी
जिल्ह्यात खरीपाचे मुख्य पीक हे कापसाचेच आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात ५ लाख २० हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. यंदा काही प्रमाणात क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असून, यावर्षी ५ लाख ३५ हजार क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत बोंडअळीचे प्रमाण कमी राहणार आहे. त्यामुळे कापसाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान , आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी यावर्षी वाढणार असल्याने देखील शेतकऱ्यांकडून कापूस लागवडीला प्राधान्य दिले जात आहे.
सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होणार
यंदाच्या खरीप नियोजनानुसार सोयाबीन या पिकांखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे क्षेत्र पूर्णपणे वाया गेले होते. मात्र यावर्षी भाव चांगले राहण्याची शक्यता असल्याने, सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये पाच ते सहा हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. तर मूग व उडीद चे क्षेत्र यंदाही गेल्या वर्षा इतकेच राहण्याची शक्यता आहे. मात्र गेल्या वर्षी उडीद व मूगाचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मक्याचा क्षेत्रात मात्र यावेळेस घट होण्याची शक्यता आहे. लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढू वाढत असल्याने शेतकऱ्यांना दोन ते तीन वेळा मक्या वर फवारणी करावी लागते. त्या बाजारात भाव देखील फारसा नसल्याने शेतकऱ्यांकडून यंदा मका लागवड क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे
पालकमंत्री घेणार ७ रोजी आढावा
जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या तयारीबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील हे ७ मे रोजी आढावा घेणार आहेत. गेल्यावर्षी बियाणांची कमतरता मोठ्या प्रमाणात भासली होती, त्यामुळे यावेळेस कोरोना च्या काळात शेतकऱ्यांची फिरफिर होऊ नये म्हणून बियाणांची मुबलकता करण्याबाबत पालकमंत्री सूचना देणार आहेत.