लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : सर्वोदय शिक्षण संस्थेच्या निवडणुकीसाठी सोमवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी चारपैकी तिघांनी माघार घेतल्याने एकूण ४८ उमेदवार रिंगणात आहे. आज मंगळवारी चिन्ह वाटप झाल्यानंतर, बुधवारपासून पुन्हा प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या विळख्यातही उमेदवारांना प्रचार करावा लागणार आहे.
उमेदवार सुपडू मांगो महाजन यांचे कोरोनाने निधन झाल्याने ही निवडणूक पुन्हा नव्याने घेण्यात येत आहे. पूर्वीचे दाखल उमेदवार वगळता, नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने चार इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी माघारीच्या शेवटच्या दिवशी एका इच्छुकाने माघार घेतली असून, एकूण ४८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.
अर्जुन माळी यांना उमेदवारी
सुपडू मांगो महाजन यांचे निधन झाले असून, विद्यमान संचालक अर्जुन देवराम माळी यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती पॅनल प्रमुख केदारसिंग पाटील यांनी दिली. माळी हे निवृत्त मुख्याध्यापक असून, विद्यमान संचालक आहे.
२ मे रोजी मतदान असणार आहे. ३ मे रोजी निकाल जाहीर होतील.
प्रचारासाठी १० दिवस मिळणार आहे.
एकूण १९ जागांसाठी हे घमासान रंगणार आहे. उदेसिंग मोहन पाटील, विकास पाटील यांच्या पॅनलचा सामना केदारसिंग पाटील व रवींद्र चुडामण पाटील यांच्या पॅनलशी होत आहे.