ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.25- मालमत्तेच्या वादातून रामानंद नगर पोलीस ठाण्यात वाद घालून शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलीस दलात सेवारत असलेले दोन भाऊ, त्यांचे पोलीस असलेली दोन मुले व इतर दोन अशा एकूण सहा जणांविरुद्ध रविवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, लालसिंग पाटील व पांडुरंग पाटील या दोन्ही सख्या भावांमध्ये शनिवारी मालमत्तेच्या कारणावरुन वाद झाला होता. त्यातून एका भावाने दुपारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. संध्याकाळी पुन्हा हा वाद उफाळून आला. दोन्हीही एकमेकांच्याविरुध्द तक्रार देण्यासाठी रामानंद नगर पोलीस स्टेशनला दाखल झाले. त्यांच्यासोबत मुले व कुटुंबातील सदस्य होते.
पोलीस स्टेशनमध्ये दिल्या ठार मारण्याच्या धमक्या
लालसिंग व पांडुरंग या दोन्ही भावांमध्ये रात्री दहा वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात प्रचंड गोंधळ घालत एकमेकांना शिव्याची लाखोली वाहिली. खुच्र्या उचलून एकमेकाच्या अंगावर टाकण्याचा प्रय} केला. परस्परांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. पोलीस खात्यातीलच कर्मचारी असल्याने ठाणे अंमलदार विजय निकुंभ, सहायक फौजदार गोपाळ चौधरी यांच्यासह उपस्थित कर्मचा:यांची त्यांची समजूत घातली, मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
डीवाय.एस.पींशी असभ्य वर्तन
पोलीस ठाण्यात गोंधळ वाढतच असल्याने ठाणे अंमलदाराने पोलीस निरीक्षक बी.जी.रोहम यांना बोलावून घेतले.त्यांनीही समजूत घातली, मात्र त्यानंतरही वाद कायम होता. रोहम यांनी डीवाय.एस.पी. सचिन सांगळे यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी देखील दोन्ही कुटुंबातील सदस्यांची समजूत घातली, मात्र त्यातील एकाने सांगळे यांच्याशीच असभ्य वर्तन केले. त्यामुळे सांगळे यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या कानावर हा प्रकार घातला. कराळे यांनी लागलीच पोलीस स्टेशन गाठले. रात्री 1 वाजेर्पयत त्यांची समजूत घातल्यानंतर सर्वाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
गुन्हा दाखल झालेल्यामंध्ये हवालदार लालसिंग उदेसिंग पाटील, त्यांचा मुलगा कॉन्स्टेबल अरुण लालसिंग पाटील (दोन्ही नेमणूक धरणगाव पोलीस स्टेशन), पांडुरंग उदेसिंग पाटील (नेमणूक: दहशतवाद विरोधी कक्ष, जळगाव), त्यांचा मुलगा कॉन्स्टेबल चंद्रसिंग पांडुरंग पाटील (नेमणूक धरणगाव पो.स्टे) या चार पोलिसांसह राहूल लालसिंग पाटील व सुनील पांडुरंग पाटील (सर्व रा.पिंप्राळा, जळगाव) यांचा समावेश आहे.