पाळधी (जि. जळगाव) : वाहनाने हॉर्न वाजवूनही रस्ता न दिल्याने झालेल्या वादाचे पर्यवसान दोन गटांत हाणामारी, जाळपोळ व लुटालुटीत झाल्याची घटना पाळधी (ता. धरणगाव) येथे मंगळवारी रात्री घडली असून या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र विक्रम पाटील यांच्या नावे असलेल्या या वाहनावरून हा वाद झाला आहे.
पाळधी गावात गुरुवारी रात्री ८ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.
घनश्याम माळी, नीलेश माळी, अनिल ऊर्फ विकी गुजर, सचिन पाटील, रोहन माळी, प्रवीण माळी, अरुण माळी यांना अटक करण्यात आली. उर्वरित १८ संशयितांचा शोध सुरू आहे. सात जणांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
वाहनातून गुलाबराव पाटील यांच्या परिवारातील महिला सदस्या लाडली गावाकडून पाळधीकडे येत होत्या. त्यावेळी कारचालक अमोल बागूल याने रस्त्यावर थांबलेल्या तरुणांना हॉर्न वाजवून बाजूला होण्याबाबत इशारा दिल्याने किरकोळ वाद झाला. या वादाची माहिती होताच दोन गट समोरा-समोर आले. वाद वाढला आणि जमावाने दुकानांची तोडफोड व जाळपोळ केली. याबाबत जावेद पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेनंतर जळगावहून अतिरिक्त पोलिस कुमक मागवण्यात आली. गावात दंगा नियंत्रक पथक तैनात करण्यात आले. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी रात्रीच पाळधीला भेट दिली होती.
कारचालक अमोल बागूल (२८, रा. पाळधी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हॉर्न वाजविल्याचा राग आल्याने ५ ते ६ जणांनी शिवीगाळ व दमबाजी केल्याचे यात म्हटले आहे.