जळगाव : सर्पमित्र असलेल्या निलेश उर्फ बंटी भानुदास पाटील (रा.वल्लव नगरी, पाचोरा मुळ रा.राजोरे) याच्या घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन तोंडाचे मांडूळ व तलवार जप्त केली आहे. निलेश याला अटक करुन त्याच्याविरुध्द पाचोरा पोलिसात व वन विभागात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.पाचोरा येथे भडगाव रस्त्यावर एका सर्पमित्राकडे पाण्याच्या टाकीत दोन महिन्यापासून दोन तोंडाचे मांडूळ व तलवार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांना मिळाली होती. त्यानुसार रोहोम यांनी अनिल देशमुख, विनोद पाटील, विजयसिंग पाटील, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील व विलास पाटील यांचे पथक पाचोरा येथे पाठविले होते. या पथकाने वन विभागात जावून त्यांची मदत मागितली. त्यानुसार वनपाल सुनील ताराचंद भिलावे यांना सोबत घेऊन निलेश पाटील याचे घर गाठून झडती घेतली असता दोन लीटरच्या पाण्याच्या टाकील दोन तोंडाचे मांडूळ तर एका कोपऱ्यात तलवार लपविण्यात आल्याचे आढळून आले. विलास पाटील यांच्या फिर्यादीवरुन निलेश पाटीलविरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९,४४ व अधीसूची ४ तसेच आर्मअॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करुन निलेशला अटक करण्यात आली.मांडूळची किंमत लाखो रुपयेनिलेश पाटील याने दोन महिन्यापासून मांडूळ घरात ठेवला होता. दोन तोंडाच्या मांडूळला लाखो रुपयाची किंमत मिळते. या मांडूळचा वापर गुप्तधन व इतर गैरकामासाठीच जास्त केला होता. जंगलातच हे मांडूळ आढळले. दोन तोंडाचे मांडूळ तर दुर्मिळ असते.
सर्पमित्राकडे आढळले मांडूळ व तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:53 PM