जळगाव : शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सांवत यांनी नवीपेठ भागातील एका बड्या हॉटेलच्या आवारात नुकतेच संपर्क कार्यालय सुरु केले आहे. विशेष म्हणजे शहरातील मुख्य भागात शिवसेनेचे संपर्क कार्यालय असताना संपर्कप्रमुखांना वेगळी चूल मांडण्याची गरज काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संपर्क प्रमुखांनी सुरु केलेल्या संपर्क कार्यालयामुळे चर्चांना उधाण आले आहे.विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने जिल्ह्यात मोठे यश मिळवल्यानंतर शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह भरला आहे. संपर्क प्रमुख सावंत यांचे सातत्याने दौरे सुरु झाले आहेत. मात्र, पक्ष कार्यालय असताना संपर्क प्रमुखांनी वेगळे संपर्क कार्यालय सुरु केल्यामुळे राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. संपर्क कार्यालय सुरु करणारे सावंत जिल्ह्यातील पहिलेच संपर्क प्रमुख ठरले आहेत. आतापर्यंत कोणत्याही शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांनी स्वत:चे संपर्क कार्यालय सुरु केले नव्हते. दरम्यान, आधी जी संपर्क कार्यालये होती ती मध्य भागातच होती.पंचतारांकित हॉटेल सारखे कार्यालयसावंत यांचे कार्यालय एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखेच आहे. शिवसेनेच्या एकाही आमदाराचे संपर्क कार्यालयात अशाप्रकारच्या सुविधा नाहीत. दरम्यान, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सावंत यांनी आतापर्यंत गोलाणी मार्केटमधील शिवसेनेच्या कार्यालयात आतापर्यंत एकही बैठक घेतलेली नाही. संपर्क प्रमुखांचे स्वतंत्र संपर्क कार्यालय ही संकल्पना देखील शिवसेनेत नसल्याची माहितीही सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.पक्ष कार्यालय असताना संपर्क कार्यालयाची परंपरा कायमजिल्ह्यात नेत्यांनी पक्ष कार्यालय असताना आपला कारभार चालविण्यासाठी संपर्क कार्यालय सुरु करण्याची परंपरा आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे हे आपला कारभार हे मुक्ताई बंगल्यावरूनच पहायचे, सुरेशदादा जैन हे ७, शिवाजीनगर या आपल्या निवासस्थानातून, गिरीश महाजन हे जी.एम. फाऊंडेशन येथून तर चंद्रकांत पाटील यांनी देखील वेगळे संपर्क कार्यालय सुरु होते.संपर्क कार्यालयाची गरज होती. लवकरच शिवसेनेचेही नवीन कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. आता आपण एका लग्नात आहोत. याविषयी बोलतो- संजय सावंत, जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेना.
पक्ष कार्यालय असताना सेना संपर्क प्रमुखांची ‘वेगळी चूल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:36 PM