लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव- काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील आमदारांना राज्य शासनाकडून एक काेटींचा अतिरीक्त निधी मंजुर करण्यात आला आहे. या निधीतून कोरोनावरील उपाययोजनांसाठी आवश्यक साहित्य औषधी खर्च करण्यात येणार आहेत. शहरासाठी मिळालेल्या निधीतून महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्यात येणार आहे.. या निधीतून भरीव काम हाेणे अपेक्षित असल्याने ऑक्सिजन सिलिंडरसह ऑक्सिजन बेड उभारण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना आमदार सुरेश भाेळे यांनी मनपा वैद्यकीय विभागाला दिल्या आहेत.
शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे मनपा वैद्यकीय विभागाच्या पथकाने शहरातील नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यावर अधिक भर द्यावा, अशा सूचनाही आमदार भोळे यांनी दिल्या. महापालिका प्रशासनाने शहरातील विविध भागात अँटिजन कॅम्प सुरू केल्यामुळे लक्षणे असलेले नागरिक स्वतःहून या ठिकाणी टेस्ट करून घेत आहेत, मनपाकडून जास्तीत जास्त नागरिकांच्या टेस्ट केला जात आहेत. यामुळे कोरोनाचा होणारा फैलाव आटोक्यात येऊ शकतो म्हणून मनपा प्रशासनाने अजून कॅम्प वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत.
राज्य शासनाकडून प्रत्येक आमदाराला कोरोनावरील उपाययोजनांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा आमदार निधी प्राप्त झाला आहे. या निधीअंतर्गत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी बुधवारी महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आमदार सुरेश भोळे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, मनपा उपायुक्त श्याम गोसावी, कपिल पवार, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. शिरीष ठुसे, मनपा वैद्यकीय अधीक्षक राम रावलानी, विजय घोलप आदींची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये कोरोना संदर्भात शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्याच बरोबर अनेक उपाययोजनांवर विचार विनिमय करण्यात आला. ज्यामध्ये शहरांमध्ये आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर जास्तीत जास्त भर दिला जावा, तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता १४ दिवस विलगीकरणात राहणे बंधनकारक असणार आहे. जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होईल. कोविड केअर सेंटरमधून काही रुग्णांनी जेवणासंबंधित तक्रारी केल्या होत्या, त्यामुळे आता कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना पोषक , चांगल्या दर्जाचे आणि वेळेवर जेवण देण्यात यावे, अशा सूचना आमदार सुरेश भोळे यांनी बैठकीमध्ये केल्या आहेत. तसेच कोविड केअर सेंटरमधील रुग्णांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उत्तमरित्या केली जावी, असेही बैठकीमध्ये सांगण्यात आले.
अव्वाच्या सव्वा बिले घेणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा
खासगी रुग्णालय कोविड रुग्णाकडून अवाढव्य बिल आकारात असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्यानंतर खासगी रुग्णालयांनी असे बिल आकारू नये, अन्यथा दोषींवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही कोरोना आढावा बैठकीत खासगी रुग्णालयांना देण्यात आला आहे. राज्यात सध्या रेमडेसिविरचा तुटवडा आहे. त्यामुळे डॉक्टरांनी रेमडेसिविर संबंधित शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, ज्या रुग्णाला जास्त आवश्यकता असेल, तिथेच रेमडेसिविरचा वापर करावा, कारण सर्वच कोरोनाबाधितांना रेमडेसिविरची आवश्यकता नसते, रुग्ण अत्यंत अत्यवस्थ अवस्थेत असेल, तरच रेमडेसिविरचा वापर करण्यात यावा अशा सूचनाही कोरोना आढावा बैठकीत महापौरांनी दिल्या आहेत.
वैद्यकीय विभागाकडून मागवली यादी
कोरोना वरील उपाययोजनांसाठी शासनाकडून आमदारांना एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला कोरोनावरील उपाययोजनांसाठी आवश्यक साधनसामग्री, औषधी व इतर वस्तू खरेदी करण्याबाबतची यादी मनपा आयुक्तांकडे दोन दिवसात सादर करण्याच्या सूचना आमदार भोळे यांनी मनपा वैद्यकीय विभागाला दिल्या आहेत. नागरिकांना मनपाच्या कोरोना सेंटरमध्ये आवश्यक सुविधा पुरवण्याच्या सूचनादेखील आमदार भोळे यांनी दिल्या आहेत. मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांना दोन दिवसात आवश्यक साहित्य व औषधीबाबतची यादी सादर करण्याचा सूचनाही आमदार भोळे यांनी दिल्या आहेत.
मनपाच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण
आमदार निधीतून आमदार सुरेश भोळे यांनी महानगरपालिकाकरिता रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण बुधवारी करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक विशाल त्रिपाठी, भाजपा जिल्हाध्यक्ष महानगर दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील आदी उपस्थित होते. गेल्या वर्षी देखील आमदार भोळे यांना आमदार निधीअंतर्गत एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता, त्यात महापालिकेसाठी चार रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय झाला होता, त्यापैकी एक रुग्णवाहिका महापालिकेच्या सेवेत उपलब्ध झाली आहे.