लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना बरे होणाऱ्यांची संख्या त्या मानाने कमी आहे. त्यामुळे रुग्णांना दाखल करताना बेडची अडचण यायला नको म्हणून प्रशासनाकडून आता उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात मोहाडीच्या महिला रुग्णालयाचे ९५ टक्के काम झाले असून आगामी पंधरा दिवसांत या ठिकाणी २०० बेडचे डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.
शहरातील कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. मात्र, त्या ठिकाणी बेडची कमतरता भासायला सुरुवात झाली असून आता देवकर कॉलेज परिसरात असलेल्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात ५० बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासह इकरा वैद्यकीय महाविद्यालयातील एका हॉस्टेलमध्ये अतिरिक्त ५० बेड वाढविण्यात येणार असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. ग्रामीण भागातील डीसीएचसी सुरू करण्यात आलेल्या असून या ठिकाणीही रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत ॲक्टिव्ह केसेसपैकी ९० टक्के रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर दहा टक्के रुग्णांपैकीही गंभीर रुग्ण कमी असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
जीएमसीत तीन कक्ष कोरोनासाठी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कक्ष क्रमांक ७, ८ व ९ यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. या ठिकाणी साधारणत दीडशे बेडची व्यवस्था होणार असून या कामाला शुक्रवारी सुरुवात करण्यात आली होती. जीएमसीत आधी सी१, सी २ आणि सी ३ अशा तीन कक्षांमध्ये १२१ रुग्ण दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यासह जुन्या अतिदक्षता विभागात १६ रुग्ण दाखल केले जात होते. मात्र, रुग्णसंख्या अधिकच वाढत असल्याने आता हे तीन कक्षही कोरोना रुग्णांसाठी राहणार आहेत. या कक्षांची काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पाहणी केली होती.