आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दुसऱ्या लाटेत प्रतिदिन जेवढी ऑक्सिजनची मागणी होती, त्याच्या तिपटीने व्यवस्था तिसऱ्या लाटेसाठी करा, अशा सूचना आरोग्य विभागाच्या अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिल्या असून, त्या दृष्टीने आता जिल्ह्यात नवीन ५ लिक्विड ऑक्सिजन टँकला तांत्रिक मान्यता देण्यात आल्या आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत सर्व प्रकल्प पूर्ण होऊन एका दिवसाला २११ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणार आहे. हे दुसऱ्या लाटेतील एका दिवसाच्या मागणीच्या पाच पट आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. तांत्रिक मान्यता मिळालेल्या टँकला एक दोन दिवसात प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर तातडीने त्यांची ई टेंडरींग प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यानुसार लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसह काही कामे ही ३१ जुलैपर्यंतच पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सोमवारी या सर्व तयारीचा जिल्ह्याकडून आढावा घेतला असून, ही सर्व माहिती त्यांना देण्यात आली आहे.
१ हजार सिलिंडर घेणार
जिल्ह्यात ५ हजार सिलिंडर असून, जिल्ह्यात १ हजार नवे सिलिंडर घेण्यात येतील, शिवाय यात १०० ड्युरा सिलिंडरही राहणार आहेत. ऑक्सिजन प्रकल्पांमधून ऑक्सिजन नेण्यासाठी हे सिलिंडर लागणार आहेत.
आता असे मिळेल ऑक्सिजन
७० टक्के लिक्विड ऑक्सिजन
२० टक्के सिलिंडर,
१० टक्के निर्मिती प्रकल्प
काय नियोजन?
१ जीएमसीत २० किलोलिटर तर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात २६ किलोलिटरचे ऑक्सिजन टँक आहेत.
२ मोहाडी रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे फाउंडेशन तयार होऊन कॉम्प्रेसर येणार आहे. आठ दिवसात हा प्रकल्प पूर्ण होईल, अशीच स्थिती चोपडा, मुक्ताईनगर येथील प्रकल्पांची आहे. येत्या पंधरा दिवसात हे प्रकल्प पूर्ण होणार आहेत.
३ मोहाडी येथे २० किलोलिटर तसेच चोपडा येथे १३ किलो लिटर लिक्विड ऑक्सिजन टँकचे काम ३१ जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे.
४ मोहाडी येथे दुसरा २० किलो लिटरचा टँक, भुसावळ, अमळनेर, मुक्ताईनगर, चाळीसगाव या ठिकाणी प्रत्येकी १३ किलोलिटरचे टँक यांना तांत्रिक मान्यता देण्यात आल्या आहेत.
अशी आहे स्थिती
दुसऱ्या लाटेतील मागणी ४२ मेट्रिक टन
तिसऱ्या लाटेसाठी अपेक्षित नियेाजन : १२६ मेट्रिक टन दररोज
प्रशासनाकडून सुरू असलेले नियोजन : २११ मेट्रिक टन दररोज
स्थानिक पातळीवर निर्माण होणारे ऑक्सिजन : ६० मेट्रिक टन
बाहेरून लिक्विड येऊन जिल्ह्यात होणारी साठवणूक : १५१ मेट्रिक टन