लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात सक्रिय रुग्णांची संख्या तीन हजारांवर पोहोचल्याने, शिवाय रोज संख्या वाढत असल्याने आता कोविड केअर सेंटर व बेड वाढविण्याबाबत महापालिका प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयातील काही इमारतींची आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी रविवारी सकाळी पाहणी केली. यातील एका इमारतीत सोमवारपासूनच रुग्णांना दाखल करण्यात येणार आहे.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरच्या चारही इमारती सुरू करण्यात आल्या आहेत. या इमारती जवळपास फुल्ल होण्याच्या मार्गावर असल्याने अशावेळी रुग्णांना दाखल करण्यास ऐन वेळी अडचणी नको म्हणून या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तंत्रनिकेतनमधील एका इमारतीच्या समोरील स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले असून, साधारण दहा दिवसात ही इमारतही सेवेत असेल, असे सांगण्यात आले आहे. आयुक्तांनी नवीन तपासणी केंद्र आणि या इमारतींची पाहणी केली.
अशी आहे व्यवस्था
इंजिनिअरिंग कॉलेज मुलांचे वसतिगृह दोन इमारती : २५० बेड
अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह : ९८ बेड
अन्य एक इमारत - १०० बेड
तंत्रनिकेतनमधील पी १ व पी २ इमारत : २४० बेड.
इकरा वैद्यकीय महाविद्यालय डीसीएच सोडून : १०५ बेड
सिंधी कॉलनीतील वसतिगृह : ७० बेड
तपासणी केंद्रांच्या इमारतीत व्यवस्था
ज्या ठिकाणी कोरोना चाचणी होत होती. त्यासाठी शेजारी व्यवस्था करण्यात आली असून, या इमारतीत बाधित रुग्णांना दाखल करण्यात येणार आहे. यामध्ये पार्टीशन टाकून तपासणी पूर्णत: वेगळी व बाधितांचा प्रवेश करण्याची जागा पूर्णत: वेगळी अशी व्यवस्था करण्यात येणार असून, त्यासाठी रविवारी नियोजन करण्यात येत होते.