ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. 31 - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शहरातील नाहाटा चौफुलीवर मंगळवारी सकाळी 10.50 ते 11.05 वाजण्याच्या दरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे चारही बाजूची वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या.
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, कोपर्डी घटनेतील दोषींना कठोर शिक्षा करावी आदी घोषणाबाजी आंदोलनकर्त्यांनी केली. सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा प्रसंगी निर्धार करण्यात आला. आंदोलनस्थळी रुग्णवाहिका, अग्निशमन बंब तसेच क्रेन तैनात ठेवण्यात आली होती.
अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोती मुळूक, उपनिरीक्षक आशिष शेळके व के़.टी.सुरळकर यांच्यासह आरसीपी प्लॉटून, ५० होमगार्ड, १५ महिला होमगार्ड तसेच ५० बाजारपेठ पोलीस कर्मचारी तैनात होते़ तहसील प्रशासनातर्फे सर्कल शशीकांत इंगळे यांची उपस्थिती होती.
आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी पोलीस वाहनात अटक करून पोलीस ठाण्यात आणल्यानंतर काही वेळेनंतर त्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, यावल येथील भुसावळ टी पॉर्इंटवर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला.