रावेर : भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर जावयाची लिमोझीन कार, भोसरी भूखंड प्रकरण, अपसंपदा गोळा करणे, कार्यकर्त्याचे लाच प्रकरण आदी विषयांवर खोटे आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरूद्ध भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी रावेर न्यायालयात बदनामीचा फौजदारी खटला दाखल केला होता. याप्रकरणी रावेर न्यायालयाने दोनवेळा समन्स बजावणी करूनही अंजली दमानिया सतत ७ ते ८ सुनावणीसाठी गैरहजर राहिल्याने न्यायालयाचे न्यायाधीश दिलीप मालवीय यांनी गुरुवारी सांताक्रुझ पोलीस स्टेशनला त्यांना तातडीने अटक वॉरंटचे बजावले आहे.
रावेर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीची बदनामी केल्याप्रकरणी मुंबईच्या सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियांविरूध्द रावेर फौजदारी व दिवाणी न्यायालयात भादंवि कलम ४९९ व ५०० अन्वये दि २८ जून २०१६ रोजी फौजदारी खटला क्र ४०० /१६ दाखल केला होता. दरम्यान, अंजली दमानिया यांना रावेर न्यायालयाने प्रोशेस इश्यू करून दोनवेळा समन्स बजावले होते. दरम्यान, गत सात ते आठ सुनावणीसाठी त्या सतत अनुपस्थित राहिल्याने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात यावे, असा विनंती अर्ज भारतीय जनता पार्टीचे वकील चंद्रजित पाटील व तुषार माळी यांनी दाखल केला. या अर्जावर न्यायाधीश दिलीप मालवीय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्यात आली. यावेळी न्यायालयाने सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांना वाकोला (सांताक्रूझ) पोलिसांमार्फत अटक वॉरंट बजावण्यासंबंधी आदेश दिले आहेत.