पाचोरा : बाजार समितीत मका व सोयाबीनच्या खरेदीला जोरात सुरुवात झाली असून, हमी भावापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने पाचोरा भडगाव व परिसरातील शेतकऱ्यामध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे.यंदा पावसाळ्याच्या उत्तरार्धात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. याआधी पाऊस लांबल्याने खरीप पिकाला काढण्यास उशीर झाला. त्यातच अति पावसाने खरीप पिकाचे काही अंशी नुकसान झाले आहे. त्यातच मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाची उत्पादन क्षमता ३० टक्क्यांनी घटली असून, त्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.दरम्यान, हमी भावापेक्षा जास्त भाव बाजार समितीत मिळत आहे. यामुळे आवक वाढली असून, मका, सोयाबीनचा दररोज लिलाव होऊन शेतकºयांना पेमेंटदेखील तत्काळ मिळत आहे. परिणामी तासाभरातच वाहने रिकामी होताना दिसत आहेत. भावही चांगला व अडचण नसल्याने शेतकरी समाधान व्यक्त करताना दिसत आहे.पाचोरा बाजार समितीत दररोज दोन ते अडीच हजार क्विंटल मका सुमारे १७००ते १९०० रुपये भावाने खरेदी होत आहे, तर सोयाबीनला ३२००ते ३५०० पर्यंत लिलावात भाव मिळत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव बी.बी.बोरुडे यांनी ‘लोकमत’ला दिली.