जळगाव : ऑक्सिजन पुरवठा करणारा टँकरला दिवसा उशीर झाल्याने यंत्रणेची काळजी वाढली होती. काही अनर्थं नको म्हणून तातडीने दोन ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले होत. मात्र, दुपारी चार वाजता १६ टनचा टँकर आल्याने हे टेंशन दूर झाले. दरम्यान, जिल्ह्यातील अन्य वैद्यकीय यंत्रणेतील स्थिती नियंत्रणात असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.
जिल्ह्याला आवश्यक साठ्यापैकी तंतोतंत साठा एका दिवसाला उपलब्ध होत असून शिवाय आपल्याकडे येणारे टँकर बऱ्याच वेळा दुसऱ्या केंद्रांवर पाठविले जातात. त्यामुळे काहीशा अडचणी निर्माण झाल्या होत्या. ऑक्सिजनचा तुटवडा नव्हता मात्र, टँकरला उशीर झाल्याने पुढे काही अडचण नको म्हणून तातडीने या रुग्णांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले होते. नंतर मुक्ताईनगरला वीस सिलिंडर दिल्याचे डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.
जीएमसीत आज टँकर अपेक्षित
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दररोज आठ मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजनची गरज असून गुरूवारी १६ टन ऑक्सिजन टँक भरण्यात आला होता. आता शनिवारी टँकर येणे अपेक्षित असून ते आल्यानंतर किमान एका दिवसाचे लिक्विड यात उपलब्ध होत असते. १६ टन आल्यास दोन दिवस यात निघतात. मात्र, शनिवारी टँकर यायलाच हवे, अशी स्थिती आहे.
सुरक्षा कडक
नाशिकच्या घटनेसारखी आपात्कालीन स्थिती उद्भवू नये म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजन टँकजवळ एक सुरक्षा रक्षक व तंत्रज्ञ पूर्ण वेळ नेमण्यात आले आहे. यासाठी असलेल्या समितीतील कर्मचारी थोड्या थोड्या वेळाने येऊन आढावा घेऊन रिडींग घेत असतात.