लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहर व जिल्हाभरात तब्बल १७ दिवसांपासून पाठ फिरवलेल्या वरुणराजाने सोमवारी जळगाव शहरात रिमझिम का असेना मात्र काही वेळ हजेरी लावली. शहराव्यतिरिक्त तालुक्यातील शिरसोली, आव्हाणे, ममुराबाद, आसोदा, कानळदा, भादली परिसरात चांगली हजेरी लावली आहे. १७ दिवसांच्या मोठ्या खंडानंतर शहरात पावसाचे पुनरागमन झाले असून, आठवडाभरात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. तसेच २० पासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
यंदा ३० जुलैपासून शहरात पावसाने पाठ फिरविली होती. तब्बल १७ दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास १० ते १५ मिनिटे पावसाने हजेरी लावली. शहरातील मुख्य बाजारपेठ भागात रिमझिम तर आशाबाबानगर, खोटेनगर, खंडेरावनगर भागासह केसी पार्क परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे. दुपारी झालेल्या पावसानंतर वातावरणात गारवादेखील निर्माण झाला होता. दुपारी ३ वाजेनंतर आकाशात काळे ढगदेखील कायम असल्याचेच दिसून आले.
मान्सूनचे होईल जोरदार कमबॅक
गेल्या अनेक दिवसांपासून पाठ फिरवलेल्या मान्सूनचे कमबॅक होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मध्य महाराष्ट्रापासून छत्तीसगढपर्यंत व छत्तीसगडपासून ते बिहार, नेपाळपर्यंत हवेची एक ट्रॅपरेषा तयार झाली आहे. यामुळे कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत आहे. यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे. आगामी चार ते पाच दिवस जिल्ह्यात काही अंशी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.