जळगाव : कोरोना विषाणूच्या महामारीमुळे शाळा गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. परिणामी, घरात बसून विद्यार्थीसुध्दा कंटाळले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व घरात बसून निर्माण झालेला आळस दूर व्हावा या उद्दिष्टाने आयोजित सांस्कृतिक कला महोत्सवाचे सोमवारी प.वि.पाटील विद्यालयात थाटात उद्घाटन झाले.यावेळी केसीई सोसायटीचे शालेय विभागाचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी, चंद्रकला सिंग, स्मिता कुळकर्णी, दिलीपकुमार चौधरी तसेच मुख्याध्यापिका रेखा पाटील आदींच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वालन करून कला महोत्सवाचे उद्घाटनाचा सोहळा पार पडला. हा महोत्सव १ ते ६ मार्च या कालावधीत होणार आहे. चित्र कला, कायार्नुभव, मिमिक्री, एकल गायन, वाद्य वादन, एकल नृत्य, बालगीते, कोळी गीते, देशभक्तीपर गीते, शेतकरी नृत्य, भांगडा, गुजराती नृत्य या सर्व प्रकारच्या कलागुणांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांमार्फत कला महोत्सवामध्ये केले जाईल. त्यामुळे कलागुणांचे फोटो आणि व्हिडिओ शाळेतर्फे मागविले गेले असून त्याचे प्रक्षेपण दि.३ ते ६ मार्च दरम्यान केले जाणार आहे. दरम्यान, उद्घाटन सोहळ्याचे आयोजन स्वाती पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन कल्पना तायडे यांनी केले. याप्रसंगी उपशिक्षक योगेश भालेराव, सरला पाटील, धनश्री फालक, सूर्यकांत पाटील, दीपाली चौधरी, इंदू राणे, अशोक चौधरी, देवेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.