चाळीसगाव: पाटणादेवी जंगल परिसरात वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन निर्माण करण्यात आलेले १६ कृत्रिम पाणवठे खासगी टँन्करव्दारे भरण्यात येत आहे. जंगल परिसरात अन्नसाखळी सोबतच पाण्याची उपलब्धता असावी. यासाठी हे पाणवठे तयार केले असून, यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे मार्चच्या दुस-याच पंधरवाड्यात ते कोरडे पडले. यामुळेच खासगी टँन्करने ते भरले जात असल्याची माहिती वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी एम.डी,चव्हाण यांनी 'लोकमत'शी बोलतांना दिली.चाळीसगाव शहारापासून दक्षिणेला अवघ्या १८ किमी अंतरावर हिरवाईने नटलेला पाटणादेवी परिसर असून लगत असणा-या गौताळा अभयारण्यामुळे येथे जंगली श्वापदांसह प्राणी व पक्ष्यांचा अधिवास मोठ्या संख्येने आहे.प्राणी गणनेत जंगल परिसरात पाचहून अधिक बिबटे असल्याच्या नोंदी आहेत. अनेकविध दूर्मिळ पक्षी व मोठ्या संख्येने रानडुक्कर आणि माकडांच्या टोळ्या जंगलात आहे. परिसरात इतरत्र अभावाने आढळणा-या जंगली वनस्पतीही आहेत. यंदा पर्जन्यमान सरासरी गाठू न शकल्याने जंगलातील नैसार्गिक पाणवठ्यांनी तळ गाठला आहे.पाण्याचे दूर्भिक्ष्य लक्षात घेऊन साडे सहा हजार हेक्टर जंगल परिसरात गेल्या काही वषार्पूर्वी १६ कृत्रिम पाणवठे वनविभागाने तयार केले आहे. दरवर्षी एप्रिल किंवा मे नंतर ते भरले जात. यावर्षी मात्र प्राण्यांना पाणी उपलब्ध व्हावे. म्हणून मार्च मध्येच त्यात पाणी साठवले जात आहे.
पाटणादेवी जंगलात प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:57 AM